

खडकवासला : सिंहगड पायथ्याच्या निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्पसृष्टीत रविवारी दिवाळी आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिंहगड, पानशेत भागातील आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.(Latest Pune News)
मावळा जवान संघटनेच्या पुढाकाराने व निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सामाजिक दायित्व योजनतून दिवाळीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे बारावे वंशज बाळासाहेब पासलकर यांच्या प्रयत्नातून 25 आदिवासी कातकरी आणि गरजू विद्यार्थ्यांना या वेळी सायकलींची दिवाळी भेट मिळाली. ‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय, जय शंभूराजे’, ‘जय वीर बाजी पासलकर’च्या जयघोषात आणि हलगी तुरारीच्या निनादात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती वीर बाजी पासलकर, यांच्या प्रतिमांचे आणि राजदंडाचे पूजन बाळासाहेब पासलकर यांच्याहस्ते करून या आनंदोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.
आदिवासी कातकरी समाजाच्या महिला, युवक, तसेच अठरा पगड जातींच्या मावळ्यांचे पाचशेहून अधिक वारसदार आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ओसाडे येथील पालक राजेंद्र विठ्ठल लोहकरे म्हणाले की, गोडधोड पदार्थ खाऊन क्षणाचा आनंद मिळतो. मात्र, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सायकल मिळाल्याने आज आमच्या घरी ज्ञानाची दिवाळी साजरी होत आहे.
या वेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, लक्ष्मण माताळे, लालासाहेब पासलकर, उद्योजक मयूर कोंढाळकर, नीलेश दांगट, साहिल कोंढाळकर, सचिन पिलाणे, रामदास नलावडे, गोरख लायगुडे आदी उपस्थित होते. संयोजन रोहित नलावडे यांनी केले.
सिंहगड पायथा परिसरातील निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्पसृष्टीत दिवाळीनिमित्त आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देताना मान्यवर, मावळ्यांचे वारसदार आणि महिला.