

पुणे : बालभारती - पौड फाटा रस्त्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर आता महापालिका प्रशासनही रस्त्याच्या कामासाठी सरसावले आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रस्तावित रस्त्याची जागेवर जाऊन पाहणी करत पर्यावरण मंजुरीसह आवश्यक परवानग्यासाठी तातडीने अर्ज करून ते घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. (Latest Pune News)
बालभारती ते पौड फाटा या प्रस्तावित रस्त्यावरील स्थगिती न्यायालयाने गत आठवड्यात उठवली. पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळत स्थगिती उठविल्याने महापालिकेकडून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वत: आयुक्त राम यांनी रविवारी सकाळी जागेवर जाऊन पाहणी केली.
या वेळी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अभिजीत आंबेकर, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भुतडा, उपअभियंता शैलेश वाघोलीकर, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, व क्षेत्रीय आयुक्त विजय नायकल हे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी या रस्त्याची मार्गाची तसेच जागेवरील एकूण परिस्थितीची पाहणी केली.
रस्त्याच्या कुठल्या भागामध्ये रस्ता एलिवेटेड करण्यात येणार आहे याचीही त्यांनी माहिती घेतली. या वेळी त्यांनी काम सुरू करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी (ईसी) लवकरात लवकर अर्ज करून परवानगी मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच या कामासाठी काही झाडे तोडावी लागणार असल्याने त्याबदल्यात जी झाडे लावणे गरजेचे आहे, ती झाडे लावण्याची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी या वेळी दिल्या.
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर स्वतः वृक्षारोपण करून या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ त्यांनी या वेळी केला. स्थानिक व दुर्मीळ अशी झाडे लावावीत अ्शा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यांवरील कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने या रस्त्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.