

सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते राजगुरुनगर यादरम्यान होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे की मागील 8 ते 10 दिवसांपासून पुणे-वाकड ते राजगुरुनगर हा केवळ 40 किलोमीटरचा प्रवास तब्बल 4 ते 5 तासांचा झाला आहे. याचा फार मोठा तोटा येथील एमआयडीसीतील कंपन्यांना सहन करावा लागतच आहे. परंतु, थेट राजगुरुनगरपासून नाशिकपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावर देखील यांचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. प्रगतशील महाराष्ट्राचा उत्तम अनुभव सध्या पुणे-नाशिक महामार्गावर प्रवास करणारे लाखो लोक घेत आहेत.(Latest Pune News)
सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी, रस्त्यावर नागरिकांची गर्दी आहे. शहरातील रस्त्यांवर खरेदीसाठी गर्दी होणे आपण समजू शकतो, पण याचा फार मोठा फटका सध्या पुणे-नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी ते आंबेठाण चौकापर्यंत वाहतूक कोंडी होणे हा काही आता नवीन विषय राहिला नाही. परंतु ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिस व स्थानिक प्रशासनाने एमआयडीसीतील आवजड वाहतुकीचे कोणतेही नियोजन न केल्याने शहरामध्ये खरेदीसाठी जाणारे, नियमित प्रवास करणारे, सुट्ट्यांसाठी आपल्या गावी जाणारे लाखो प्रवासी गेल्या काही दिवसांपासून पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.
पुणे-वाकड ते राजगुरुनगर हा 40 किलोमीटरचा प्रवास केवळ एक ते सव्वा तासात पूर्ण होणे अपेक्षित असताना, गेल्या काही दिवसांपासून या प्रवासासाठी तब्बल 4 ते 5 तास लागतात. ही केवळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी नसून, या रस्त्यावरून प्रवास करणार्या लगतच्या परिसरातील गावे, उद्योग आणि सर्वांत मोठे एमआयडीसीतील उद्योगांची जाणीवपूर्वक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला आहे. तरी देखील यात तिळमात्र देखील सुधारणा होत नाही. हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगत महाराष्ट्राचे खरे स्वरूप आहे का? असा सवाल येथील नागरिक, लाखो प्रवासी विचारत आहेत.
दिवाळीनिमित्त चाकण, राजगुरुनगरपासून थेट मंचर, नारायणगाव भागातील अनेक भाडी येतात, पोर्टल सेवेची मागणी होते. पण, येथील वाहतूक कोंडीमुळे एक तासासाठी चार ते पाच तास अडकून पडत असेल व पेट्रोल, डिझेलचा खर्च पाचपटीने वाढत असल्याने आम्ही या परिसरातील भाडी स्वीकारत नसल्याचे पुण्यातील पोर्टल सेवा देणाऱ्या एका कंपनीने सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ झालेली वाहतूक कोंडी.
आमच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाले. मुंबईमधून मृतदेह घेऊन रुग्णवाहिका निघून सायंकाळी 5 वाजेपर्यंत घोडेगाव येथे पोहचली. पुण्यातून घोडेगावला पोहचण्यासाठी तीन तास लागतील, असे गृहीत धरून निघालो तर चाकणच्या वाहतूक कोंडीत चार तास अडकून पडलो आणि अंत्यविधीला देखील पोहचता आले नाही.
शांताराम शिंदे, प्रवासी