

कोंडीभाऊ पाचारणे
राजगुरुनगर: ' ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे.. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहुदे.!' असे म्हणत भात्याच्या फुंकरीने धगधगणारी भट्टी, हातोड्याच्या घणाघाती आवाजात शेतीची विविध लोखंडी अवजारे आणि शेतकऱ्याच्या दैनंदिन वापरातील हत्यारे आकार घेतात आणि सगळीकडे दिवाळीची धामधून सुरू असताना ' त्यांची ' पोटाची खळगी भरण्याचे ' लक्ष्मी पूजन ' उघड्या घरात साजरे होते.
शेती आणि ग्रामीण जीवनामध्ये लोहारकामाला पूर्वापार महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला, तरी शेतीच्या दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या अनेक लोखंडी अवजारांच्या निर्मितीसाठी आजही लोहारांच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागते. लोहार समाजातील मोजक्या कुटुंबाकडून हे काम सध्या होत असल्याने या व्यवसायात परप्रांतिय कुटुंबांचा शिरकाव झाला आहे.राजगुरुनगर शहरात जुन्या पुणे नाशिक महामार्गाच्या कडेला अशी अनेक कुटुंब या कामाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत असताना पहायला मिळत आहे.
लोहाराच्या भात्याच्या साहाय्याने भट्टीतील कोळसा धगधगत ठेवला जातो आणि तापलेल्या लोखंडाला हातोड्याच्या घावातून हवा तसा आकार दिला जातो. लोहाराच्या कामातील भाता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. भात्याच्या साहाय्याने भट्टीमध्ये सतत हवा सोडली जाते. त्यामुळे कोळशाचा जाळ अधिक प्रज्वलित होऊन लोखंड लालबुंद होईपर्यंत तापते. त्यानंतर तापलेले लोखंड चिमट्याच्या साहाय्याने बाहेर काढून ऐरणीवर ठेवले जाते. हातोड्याच्या घावांनी त्याला आवश्यक आकार दिला जातो. हे काम करताना लोहाराला अनुभव, अचूकता, ताकद आणि कौशल्य यांचा सुरेख मेळ साधावा लागतो.
या पारंपरिक भट्टीमध्ये शेतीसाठी लागणारे खुरपे, विळे, कोयते, कुऱ्हाडी, टिकाव, फावडे, नांगराचे फाळ, पावडे तसेच बैलगाडी आणि शेतीच्या इतर साधनांचे लोखंडी भाग तयार केले जातात. काही अवजारांची दुरुस्ती, तुटलेले भाग जोडणे आणि बोथट झालेल्या पात्यांना पुन्हा धार लावण्याचे कामही लोहार करतात. विशेष म्हणजे प्रत्येक अवजाराचा उपयोग लक्षात घेऊन त्याची लांबी, जाडी, वजन आणि धार ठरवावी लागते. त्यामुळे हे काम केवळ लोखंड तापवून आकार देण्यापुरते मर्यादित नसून त्यामध्ये पारंपरिक ज्ञान आणि पिढ्यान्पिढ्या आलेला अनुभव महत्त्वाचा असतो.
पूर्वी गावोगावी लोहारांच्या भट्ट्या हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होत्या. शेतकरी पेरणी, नांगरणी, कापणी आणि इतर शेतीकामांच्या हंगामानुसार लोखंडी अवजारांची निर्मिती व दुरुस्ती करून घेत असत. काळानुसार आधुनिक यंत्रांचा वापर वाढला असला, तरी अनेक शेतकऱ्यांसाठी लोहाराची अवजारे आजही उपयुक्त ठरत आहेत.
मात्र बदलत्या काळात पारंपरिक लोहार व्यवसायासमोर कच्च्या मालाचे वाढते दर, तयार अवजारांची बाजारातील स्पर्धा आणि कारागिरांची घटती संख्या अशी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे लोहारकाम ही केवळ उपजीविकेची कला नसून ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्य आणि संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा आहे. भात्याच्या फुंकरीने धगधगणारी भट्टी आणि हातोड्याच्या घणाघाती आवाजातून घडणारी लोखंडी अवजारे आजही या परंपरेची साक्ष देत आहेत.