

पुणे: बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘बालविवाहमुक्त भारत’ (बीव्हीएमबी) अभियानांतर्गत राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘बालविवाहमुक्त भारत’ अभियान सुरू केले आहे.
बालविवाहासारख्या हानिकारक प्रथेविरोधात जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि समन्वित कृती वाढविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाला गती देण्यासाठी २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत १०० दिवसांचे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर २७ नोव्हेंबरच्या आसपास राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या वयानुसार बालविवाह प्रतिबंध आणि बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत विविध जनजागृती उपक्रम आयोजित करावेत, असे निर्देश दिले आहेत. तसेच शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांनी बीव्हीएमबी पोर्टलच्या माध्यमातून बालविवाहविरोधी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अभियानाचा व्यापक प्रसार करण्याच्या सूचना
अभियानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी शाळांच्या अधिकृत वेबसाइटवर जनजागृतीपर साहित्य, चित्रफिती, प्रतिज्ञा आणि संबंधित माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.