Pune News : …तर बराटे शाळेला टाळे ठोकणार

Pune News : …तर बराटे शाळेला टाळे ठोकणार

वारजे : पुढारी वृत्तसेवा :  पालिकेच्या माळवाडीमधील कै. शामराव श्रीपती बराटे मराठी व इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने एका शिक्षकाला दोन किंवा त्याहून अधिक वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. शिक्षकांवर येणारा ताण पाहता आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. शामराव बराटे शाळेत मराठी व इंग्रजी माध्यम लहान गट मिळून 1200 हून अधिक पटसंख्या असून, इंग्रजी माध्यमाच्या 14 वर्गांसाठी 8 शिक्षक आहेत. शाळा सुरू होऊन पाच महिने उलटले असतानाही शाळेत इंग्रजी माध्यम 6 व मराठी माध्यम 1 असे जवळपास 7 शिक्षक कमी असल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

सोसायटीसह वसाहतीचा भाग असलेल्या रामनगर परिसरासह वारजे माळवाडी भागातील सर्व सामान्य परिवारातील विद्यार्थी या शाळेत प्रवेशासाठी धाव घेत असतात. यंदा शिक्षक कमी असल्याने 102 विद्यार्थी शाळा सोडून गेले. शिक्षक कमी असल्याने पालकांमध्ये असंतोष असून, वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नेमणूक केली जात नाही. बराटे शाळेला मुख्याध्यापक व 14 वर्गांना 14 शिक्षक 30 ऑक्टोबरच्या आत देण्यात यावेत अन्यथा 31पासून शाळेला कुलूप लावण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. या समितीत सविता भुसेकर, संजय बनचरे, तेजस पायगुडे, प्राजक्ता अहिवळे, नेहा काकडे, बबीता विश्वकर्मा, रीना देवी, आरती झोरे, सुवर्णा रणदिवे, भाग्यश्री वांजळे, नीलम कांबळे, प्रीती पुजारी, सोनाली पवार आदींचा समावेश असून, सदस्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

याबाबत पाठपुरावा करण्यात आला असून, पालकांच्या मागणीनुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी पालक आणि प्रशासन यांची 26 ऑक्टोबरला पालिकेत एकत्रित बैठक बोलावण्यात आली आहे. उपायुक्त राजीव नंदकर, शिक्षण प्रमुख सुशीलकुमार राठोड, उप शिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण, सहायक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षिका व बराटे शाळांच्या दोन्ही मुख्याध्यापिका यांच्या समवेत ही बैठक होणार आहे.
                                               दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या

पालिकेच्या कै. शामराव श्रीपती बराटे शाळेत तातडीने दोन शिक्षक रुजू करण्यात येतील.
                                           महादेव जाधव, सहायक प्रशासकीय अधिकारी

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी सुशीलकुमार राठोड यांना माजी उपमहापौर दिलीप बराटे व शाळा व्यवस्थापन समितीमार्फत बुधवारी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात एक पात्र मुख्याध्यापक व सहा शिक्षक 30 ऑक्टोबरपर्यंत मिळावेत अन्यथा 31 तारखेपासून आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
                                     सविता भुसेकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news