पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाला पडलेल्या खिंडाराचा व्यास वाढला ! | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाला पडलेल्या खिंडाराचा व्यास वाढला !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: चेतन..! युवकांना दिशा दाखवण्याचे काम तुम्हाला करायचे आहे.., मी तुम्हाला चिरंजीव आदित्य ठाकरेंसोबत जोडून देणार आहे. लवकरच तुमची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात येईल, अशा शब्दात सन्मान करीत उद्धव ठाकरे यांनी ताथवडे येथील चेतन (आण्णा) पवार यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. बुधवारी (दि. 25) मातोश्री येथे हा सोहळा संपन्न झाला.
ताथवडे येथील युवानेते चेतन पवार हे मागील दहा ते बारा वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.

मागील दोन वर्षांपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कुटुंबीयांसोबत असताना त्यांनी भाजपचे काम केले. आगामी काळात भाजपदेखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत होती; मात्र अचानक चेतन पवार यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. चेतन पवार शहरातील युवकांवर चांगली पकड आहे. युवा कार्यकर्त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे भाजपला सुरुंग लावून ठाकरेंची शिवसेना चेतन पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत चेतन पवार म्हणाले की, ताथवडे-पुनावळे या भागाचा महापालिकेत समावेश होऊन दहा ते पंधरा वर्ष उलटली. मात्र, आजही येथील प्राथमिक समस्या सुटल्या नाहीत. मागील कित्येक वर्षांपासून मी नेतेमंडळींकडे याबाबत पाठपुरावा केला. मात्र, कचरा डेपोसह अन्य समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्याशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे.

चेतन पवार यांच्या खांद्यावर युवा सेनेची जबाबदारी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांच्या हस्ते चेतन पवार यांना शिवबंधन बांधण्यात आले. या वेळी संपर्क प्रमुख सचिन अहिर उपस्थित होते.

Back to top button