

पुणे : पुण्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असून, तो अतिशय समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुणे परिसरात अश्मयुगीन काळातील हत्यारे सापडलेली असून, मुठा नदीच्या प्रवाहात उत्खननादरम्यान ही हत्यारे आढळून आली आहेत. यावरून पुण्याला हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे लक्षात येते. मुठा नदीचे पाणी ज्ञान आणि शौर्य प्रदान करणारे मानले जाते. पुण्याची काळरेषा अत्यंत प्राचीन व समृद्ध असली तरी, आधुनिक विकासकामांमुळे अनेक जुन्या खुणा आणि ऐतिहासिक ठसे हळूहळू नामशेष होत चालल्याची खंत अभ्यासक आशुतोष बापट यांनी व्यक्त केली.
सुलभ शिक्षण मंडळ, पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित बहुश्रुत व्याख्यानमालेत ते ‘पुण्यातील नावे आणि त्यांच्या गोष्टी’ या विषयावर बोलत होते.
सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या. नागझरी, आंबील ओढा यासारखे जलस्रोत प्राचीन काळात अस्तित्वात होते. आजच्या संपूर्ण बाजीराव रस्त्यावरून पूर्वी आंबील ओढा वाहत होता.
शनिपाराजवळ या ओढ्याच्या प्रवाहामुळे अनेक लोक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आढळतात. नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याचा प्रवाह वळवला, असे बापट यांनी सांगितले.