

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून लातूरकडे एसटी बस घेऊन निघालेल्या बसचालकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी रिक्षाचालक हसन समशेर पठाण (रा. इनामदारवस्ती, बाजारमळा रोड, लोणी काळभोर) याला अटक केली आहे. याबाबत बसचालक योगेश सिद्धेर्श्वर खडके (वय 37, रा. भांडगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री अकराच्या सुमारास घडली.
संबंधित बातम्या :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खडके हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस लातूरकडे घेऊन निघाले होते. पुणे सोलापूर-हायवेवर एच. पी. गेट क्रमांक दोन येथे आरोपी हसनने त्याची रिक्षा बसला आडवी मारली. त्यानंतर रिक्षातून खाली उतरून चालक खडके यांना शिवीगाळ केली. बसचा दरवाजा उघडून खडके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांचा शर्ट फाडून जिवे मारण्याची धमकी हसनने दिली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून हसनला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपायुक्त धायगुडे करीत आहेत.