पुणेकरांनो, जरा जपून; धरणात चक्क सांडपाणी!

पुणेकरांनो, जरा जपून; धरणात चक्क सांडपाणी!
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांना पिण्याचे पाणी पुरवणार्‍या खडकवासला धरणात सांडपाणी सोडले जात आहे. म्हणजेच पुणेकर पित असलेल्या पाण्यात थेट सांडपाणीच मिसळले जात असल्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी (सीईओ) अधिकार्‍यांच्या पाहणीदरम्यान पुढे आला. हवेली आणि वेल्हे या दोन तालुक्यांतील जवळपास चोवीस ग्रामपंचायत क्षेत्रामधून काही लाख लिटर सांडपाणी धरणात सोडले जात आहे. याचा परिणाम थेट पुणेकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे सीईओ रमेश चव्हाण यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
निसर्गरम्य ठिकाण असल्याने अनेक जण पर्यटनासाठी खडकवासला परिसरातील हॉटेल, रिसॉर्टमध्ये जातात. पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. हवेली तालुक्यातील एकोणीस आणि वेल्हे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे क्षेत्र आहे. या भागातील लोकसंख्या सुमारे 55 हजार पेक्षा जास्त असून, पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची संख्या ही अधिक आहे. या परिसरात सुमारे 501 लहान मोठी हॉटल्स, रिसॉर्ट असून, त्यांचे सांडपाणी वितरण आणि शुद्धीकरणासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यातून 1 लाख 94,580 लिटर प्रतिदिन सांडपाणी निर्माण होत असल्याचे जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारताना सांडपाणी प्रक्रिया अथवा बांधकामांसाठी ग्रामपंचायतकडून त्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देखील घेतले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  धरणापासून दूर असणार्‍या छोट्या गावांमध्ये सांडपाणी धरणापर्यंत येत नाही. मात्र, धरणालगतची गावे आणि काही हॉटेल्स यांच्याकडून सांडपाणी सोडले जात असल्याने धरणाच्या पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणातील पाण्याच्या बाबत सर्व यंत्रणा एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता निर्माण झाले असल्याचे अधिकारी सांगतात.
खडकवासला धरण क्षेत्रातील गावे आणि ग्रामपंचायत यांच्या सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन सांडपाणी, तसेच जलप्रदूषणविषयक बाबींची माहिती संकलित करण्यात आली आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन, त्याचबरोबर तातडीचे उपाय केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेबरोबरच पीएमआरडीए आणि जलसंपदा, जिल्हा प्रशासन असा एकत्रित विचार या अहवालावर केला जाणार आहे.
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news