रत्नागिरी : अघोरी कृत्य करून पैसे उकळणाऱ्या भोंदूबाबाला २० हजारांचा दंड | पुढारी

रत्नागिरी : अघोरी कृत्य करून पैसे उकळणाऱ्या भोंदूबाबाला २० हजारांचा दंड

खेड : पुढारी वृत्तसेवा : अघोरी कृत्य करून आजार दूर होईल, तुला भूत बाधा झालेली आहे, असे सांगून पैसे उकळणाऱ्या खेड येथील भोंदूबाबाला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. एम. चव्हाण यांनी वीस हजार रुपये दंड व परीविक्षेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सन २०१६ मध्ये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक महाराज उर्फ अशोक गोवळकर (रा. गोवळकरवाडी, वेरळ ता. खेड, रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

संबंधित बातम्या 

खेड तालुक्यातील वेरळ येथे सन २०१६ मध्ये अशोक महाराज उर्फ अशोक गोवळकर याच्याकडे एक महिला आजारी असल्याने गेली होती. त्यावेळी त्याने अंगात आल्यासारखे करत तंत्र- मंत्र वाचून होम हवन केले. या सर्वाला खर्च येईल असे महाराजांनी सांगितल्यानंतर त्या महिलेने त्यांना सर्व खर्च दिला. तरीही काहीही गुण आला नाही. त्यामुळे संबंधित महिलेने पैसे परत मागण्यासाठी अशोक महाराज याच्याकडे गेल्या. यानंतर महाराजांनी माझे खूप बॉडीगार्ड असून तुझा बंदोबस्त करतील असे म्हणत त्या महिलेला महाराजांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

हा घडलेला प्रकार त्या महिलेने खेड पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी अशोक महाराज विरोधात भारतीय दंड विधानातील कलम ४२० अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. तसेच भारतीय दंड विधानातील कलम ५०६ आणि महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम २०१३”अन्वये गुन्हा दाखल केला.

अशोक महाराजाच्या विरोधात खेड येथील न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारी पक्षातर्फे वकील स्मिता कदम यांनी युक्तिवाद केला. आज अशोक महाराज यांच्या विरोधात चाललेल्या फौजदारी खटल्याचा निकाल देताना या अघोरी प्रथेचे समूळ उच्चाटन व्हावे असा प्रोबॅशन बाँड अशोक महाराज याच्याकडून लिहून घेण्यात आला. यानंतर जर न्यायालयाच्या निदर्शनास सदर अघोरी प्रकारची पुनरावृत्ती झाल्याचे आढळून आले तर त्या क्षणी कायद्यात तरतुदीनुसार कठोर शिक्षेस तो पात्र होईल,अशी समज देण्यात आली. या प्रकरणी अशोक महाराजला वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

सदर रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार महिलेस देण्यात येणार आहे. ती निर्धारित वेळेत कोर्टात जमा न केल्यास पुन्हा कठोर शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अशोक महाराज याला परिवीक्षा ठरवून देण्यात आली आहे. म्हणजे परिवीक्षा कार्यकाळ काही निश्चित काळपर्यंत मॅजिस्ट्रेट कोर्टातील अधिकाऱ्याला परिवीक्षा अधिकारी भेटण्याच्या अटीवर त्याला तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच्या सुधारण्याच्या आणि चांगल्या वर्तनाच्या अटीवर त्याला मोकळे सोडण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास खेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, अनिल गंभीर यांनी केले.

Back to top button