

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई ता.: दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्यात 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी पत्र परिषद घेत माझे भांडण विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे विधान करीत शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला होता.ज्यांना राजकारणातले एबीसी कळत नाहीत असे काही लोक आहेत, त्यामुळे मी शिवसेना नेता पदाचा त्याग करतोय, बाळासाहेब हेच माझे दैवत आहे आणि पुढेही राहील असे ते शब्द होते.
या घटनेला वीस वर्षे पूर्ण होत असताना राज ठाकरे झाले गेले विसरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करणार आहेत.ठाकरे ब्रँडच्या प्रतिष्ठापनेसाठी दोघे परत एकत्र आले आहेत. दोन ठाकरे मुंबईतल्या मराठी माणसाला त्याचा न्याय हक्क मिळवून देणार आहेत.भाजपच्या प्रभावाशी लढण्याची भाषा करत आहेत. या लढ्याला जनता कसा प्रतिसाद देते ते कळेल पण गेल्या वीस वर्षांमधल्या या प्रवासाचे काही टप्पे या एकत्रीकरणाच्या घडीला लोकांना अर्थातच आठवत आहेत.
2002 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेत केवळ बाळासाहेब यांचा शब्द अंतिम असेल असे एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखतीत सांगितले. आपण उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात असल्याचे ते संकेत होते. त्यानंतर दोन भावांमधील दुफळी वाढत गेली आणि ती पक्ष स्थापनेपर्यंत दुरावली. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देऊ नये असे उद्धव यांचे टो काचे मत होते असे त्यावेळी सांगितले जाई.नारायण राणे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना ही काही काळ स्व शोधाच्या कामात गुंतली होती.
मात्र काळाचा महिमा अगाध असतो.मुंबईतल्या मराठी माणसासाठी दोन भाऊ आज एकत्र येत आहेत.वीस वर्षांपूर्वी मात्र या दोन भावांमधील उभ्या फुटी मुळे 2005 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार मुंबईतून निवडून येऊ शकला नव्हता. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांची दोन आकडी आमदार संख्या निवडून आली होती. त्या वावटळीमूळे शिवसेनेला शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच काहीसे वाईट दिवस बघावे लागले होते.मग उद्धव ठाकरे यांनी संघटनेवर प्रचंड पकड दाखवत महाराष्ट्रात स्वबळावर लढून 2014 साली लक्षणीय जागा मिळवल्या आणि आपण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष असून भावाने केलेल्या एकेकांच्या बंडाचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दाखवून दिले.
वेगळे लढलेले उद्धवजी पुन्हा भाजपसमवेत आले,युतीत गेले.2019 साली मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने पाळले नाही अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी भाजपपासून वेगळे झाले आणि धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचा सदस्य झाले. मुख्यमंत्री झाले.भारतीय जनता पक्षाला या धक्क्यातून बाहेर यायला दोन वर्षे लागली तरी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करत त्यानंतर 40 आमदार मातोश्रीला नाकारून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळे झाले.या काळात मनसेची पण प्रचंड पडझड झाली होती दोनही ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या नव्या शक्तीसाली अवतारात स्वतःचे अस्तित्व शोधत होते.एकेकाळी एकमेकांवर आरोप करणारे, बाळासाहेब ठाकरे यांना जेवणात काय दिले जाते याबद्दल जाहीर आरोपही झाले.दोघे भाऊ आता झाले गेले विसरून एकत्र येत आहेत.
एकत्र येण्याची घोषणा होणार आहे ती वरळी समुद्रकिनाऱ्यावरील ब्लू सी या हॉटेलात.याच हॉटेलात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत 2019 च्या निवडणुकांपूर्वी समसमान जागांच्या आणभका घेतल्या गेल्या होत्या पन्नास टक्के जागा आणि समसमान संधी याचा अर्थ मुख्यमंत्री पद आहे असा काढत उद्धव ठाकरे नंतर वेगळे झाले. त्याच ब्लूसी हॉटेलमध्ये उद्या वीस वर्षानंतर दोघेही ठाकरे एकत्र येत आहेत मराठी माणूस त्यांचे हे एकत्र येणे स्वीकारेल का,मुंबई ही मराठी माणसाची आणि येथे प्रसिद्ध झालेला ठाकरे ब्रॅण्डची आहे का याची उत्तरे पुढच्या तीन आठवड्यात मिळणार आहेत.ठाकरे विरुद्ध ठाकरे हा 20 वर्षांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला भाऊबंदकीचा अध्याय संपला. ठाकरे आणि ठाकरे एक झाले आहेत. प्रवास पूर्ण झाला आहे तो जनतेला आवडतो का ते काही दिवसांनी कळेल.
राज ठाकरे यांचा संख्या शास्त्रावर विश्वास आहे नऊ हा त्यांना कायम लाभ मिळवून देणारा आकडा आहे राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करताना एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या नेतेपदाचा त्याग करताना तारखांची बेरीज नऊ होईल किंवा तारीख नऊच असेल याकडे कायम लक्ष दिले होते उद्या भाऊबंदकी त्यागून भावबंधनात शिरतानाही राज ठाकरे यांनी नवाची साथ सोडलेली नाही उद्या 24 12 2025 ही तारीख आहे यातील तारीख आणि महिना यांची बेरीज नऊ आहे आणि 2025 या वर्षाची ही बेरीज नऊ आहे वाद त्यागून पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण करताना नवाचा हा महिमा राज ठाकरे यांना कशाप्रकारे साथ देतो त्याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे