सुपेचा चालक पाठवत होता नावे; आणखी दोघांना अटक

TET Exam scam
TET Exam scam

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असणार्‍या सुनील घोलप याच्यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली.

सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे व हॉल तिकीट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम घोलप करत असल्याचे समोर आल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने दोघांना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच न्यायालयात हजर केले असता युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. जाधव म्हणाले, 'सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणार्‍या घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहेत.

व्हॉट्स अॅपवर पाठवायचा हॉल तिकीटे

सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित असे. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटस अ‍ॅप चॅटिंग बाबत पुरावा हस्तगत करायचा आहे. घोलप याने स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत. तर, डोंगरे हा सुपे व सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता.' या प्रकरणात त्याला तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली.

दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी करताना सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, 'गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप यांचे तांत्रिक विश्लेषण करून डिजिटल पुरावा मिळवायचा आहे. आरोपींविरोधात आणखी पुरावे मिळवून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे आहे.'

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. विश्वास खराबे हे काम पाहत आहेत. त्यांनी तपासी अधिकार्‍यांना तपासाच्या दृष्टीने आवश्यक सर्व गोष्टी देण्यात आल्या असून तपास पूर्ण झाला आहे. तसेच पोलिस कोठडीदरम्यान सुपे यांनी पोलिसांना सहकार्य केले असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सुपे व सावरीकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यामुळे यापुढे सुपे व सावरीकर यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे.

आरोग्य पेपरफुटी प्रकरणी शर्मा ताब्यात

आरोग्य विभागाच्या गट 'क' पदाच्या अनुषंगाने तपासात निशीद गायकवाड याला नागपूर येथून तर राहुल लिंघोट याला अमरावती येथून अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीत या दोन एजंटांना आशुतोष शर्मा आणि इतरांनी पेपर पुरविल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आशुतोष श्रीवेदप्रीय शर्मा (38, रा. दिल्ली) याला त्याच्या मोबाईल लोकेशनवरून दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे.

56 परीक्षार्थींकडून घेतले प्रत्येकी 40 हजार रुपये

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी 56 परीक्षार्थींकडून प्रत्येकी 40 हजार रुपये घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. निखिल कदम याने अश्विनकुमार शिवकुमार याला 4 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या ई-मेलमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. जाधव म्हणाले, 'कदम याने शिवकुमार याला टीईटीच्या परीक्षार्थींकडून पैसे घेतल्याबाबतचा ई-मेल केला असल्याचे दिसून येत आहे.

त्रिपाठी याच्या उपस्थितीत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे. आरोपी व त्यांच्या साथीदारांनी बनावट गुणपत्रक कोठे व कोणी तयार केले याबाबतचा तपास करायचा आहे. या प्रकरणातील सुखदेव डेरे याच्या गावच्या राहत्या घराच्या झडतीदरम्यान 2 लाख 90 हजार 380 रुपये रोख स्वरुपात मिळून आले असल्याने त्याचा तपास करायचा आहे. याखेरीज, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी कदम, शिवकुमारसह सौरभ त्रिपाठी यांच्या पोलिस कोठडीत 2 जानेवारीपर्यंत वाढ केली. बचावपक्षातर्फे अ‍ॅड. प्रणयकुमार लंजिले, अ‍ॅड. अनिकेत डांगे, अ‍ॅड. लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news