पुणे : पुढारी वृत्तसेवा
ऑनलाईन पेपर कसे फोडावेत, याच्या विविध पध्दतीबाबत प्रशिक्षण देणारे सेंटर बिहार येथील पटना येथे असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी प्रशिक्षण घेतले आहे का ? त्या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही आरोपींचे संबंध भारतातील विविध परीक्षा फुटीशी असून 15 वर्षापासून काही जण सक्रीय सहभागी असल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.
पेपर फुटीच्या घटना होऊ नयेत यासाठी खासगी कंपनीकडून परीक्षा न घेता शासनाकडून परीक्षा घेण्यात याव्यात. परीक्षा ज्या विभागाची आहे त्या विभागाच्या त्या जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेने परीक्षा आयोजित करावी, परीक्षेवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही सुविधा असावी. परीक्षेचा डाटा शासनाकडे काही वर्ष ठेवला जावा. परीक्षा पेपर प्रिंटींग करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका संकलित करणे आणि उत्तरपत्रिका तपासणी करणे त्याचे संगणीकरण करण्याबाबत उपाय योजना शासनाला सुचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.