दिशा सालियन प्रकरण : आम्हाला आत्महत्या करावेसे वाटते! | पुढारी

दिशा सालियन प्रकरण : आम्हाला आत्महत्या करावेसे वाटते!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दिशा सालियनच्या आत्महत्येवर सुरू असलेले राजकारण दुर्दैवी असून हा प्रकार थांबविण्याची विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी मंगळवारी केली आहे. कामाच्या तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट करत राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आम्हाला आत्महत्या करावेसे वाटतेय, अशा शब्दांत दिशाच्या पालकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, दिशा सालियनच्या पालकांची भेट घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. आयोगाने या दोन्ही तक्रारींची गंभीर दखल घेतली असून मालवणी पोलिसांना 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दिशाच्या आत्महत्येवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आरोपांच्या फैरी सुरु केल्या आहेत. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही 6 मार्चनंतर या प्रकरणात मोठा खुलासा होईल, असे सूचक वक्तव्य केले आहे. मात्र या आरोपांमुळे आमच्या मुलीचा रोज मृत्यू होत असल्याची खंत दिशाच्या पालकांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना दिशाची आई म्हणाली की, कामाच्या तणावातून दिशाने आत्महत्या केली. मात्र आम्ही ज्यांना मतदान करतोय, तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. शवविच्छेदन अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. तरीही तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून राजकारणी तिची बदनामी का करत आहेत?, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

Back to top button