Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणा माफिया टोळी प्रमाणे मागे लागल्या; मलिकांच्या ईडी चौकशीवर संजय राऊतांची टीका | पुढारी

Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणा माफिया टोळी प्रमाणे मागे लागल्या; मलिकांच्या ईडी चौकशीवर संजय राऊतांची टीका

मुंबई; पुढारी ऑनलाईन

दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, केंद्रीय तपास यंत्रणा माफिया टोळी प्रमाणे मागे लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. २० वर्षानंतर चौकशी का केली जात आहे?. किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची काही प्रकरणे ईडीकडे दिली आहे. त्याचं काय झालं? त्यांची चौकशी का केली जात नाही? असे सवाल त्यांनी केले आहेत.

महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय यंत्रणा घेऊन गेली आहे. पण कितीही खोटं करू द्या. सत्याचा विजय होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. येत्या काही दिवसांत एक एक अधिकाऱ्याला एक्स्पोज करेन आणि त्याचे परिणाम भोगायला मी तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

२०२४ नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. नवाब मलिक सत्य बोलतात. म्हणून त्यांची चौकशी केली जात आहे का? असा सवालदेखील त्यांनी केला आहे. सत्य बोलणाऱ्यांच्या मागे ईडी लावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांचा उल्लेख करत ते भ्रष्टाचाराशी लढणारे महात्म असल्याचा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.

सत्य भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय : शरद पवार

सत्य भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातो आहे. नवाब मलिकांवर जो आरोप झाला होता तसाच आरोप माझ्यावरही झालेला होता. त्यात काही नवीन नाही. केंद्राकडून ईडीचा गैरवापर केला जात आहे. नवाब मलिकांना त्रास होईल याची आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर : जयंत पाटील

भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली. यामुळे त्यांना अडचणीत आणलं जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज बुधवारी सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडी कार्यालयात मलिकांची चौकशी सुरू आहे. सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मलिकांच्या घरात दाखल झाले होते. नवाब मलिकांना ईडीने दाऊदच्या मालमत्ता व्यवहार चौकशीसाठी नेलं असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर जवळच्या डोंगरावर आहेत ही पुरातन मंदिरं | Travel Vlog

Back to top button