वेल्हे : धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा दहा टक्के कमी पाणी; अल्प पावसाने चिंता कायम

वेल्हे : धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा दहा टक्के कमी पाणी; अल्प पावसाने चिंता कायम

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुलैचा दुसरा आठवडा सुरू होऊनही पानशेत-वरसगाव खोर्‍यात अल्पप्रमाणात पाऊस पडत आहे. अद्यापही धरणांमध्ये समाधानकारक पाणी नसल्याने चिंता कायम आहे. पानशेत धरण फुटीच्या स्मृती जिवंत करणार्‍या बुधवारी (दि. 12) धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत 10 टक्के कमी पाणीसाठा आहे. सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 8.19 टीएमसी म्हणजे 28.10 टक्के साठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन टीएमसी कमी पाणी आहे. गतवर्षी आजच्या दिवशी 12 जुलै 2022 रोजी धरण साखळीत 10.79 टीएमसी म्हणजे 37.01 टक्के पाणी होते.

गतवर्षी 11 जुलैपासून पानशेत खोर्‍यात अतिवृष्टी सुरू होती. त्यामुळे 12 जुलै रोजी एकाच दिवसात धरण साखळीत दोन टीएमसी पाण्याची वाढ झाली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पानशेत, वरसगाव खोर्‍यात पावसाचे ढग दाटून आले. रिमझिम पाऊस सुरू झाला. मुठा, सिंहगड भागातही पावसाळी वातावरण तयार झाले.

त्यामुळे पुन्हा चांगल्या पावसाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सकाळपासून मात्र पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरण माथ्यावर एक मिलिमीटरही पावसाची नोंद झाली नाही. दिवसभर पावसाने उघडीप दिली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरण क्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाली असल्याची माहिती पानशेत धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनुराग मारके यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news