वानवडी : सदनिकेबाहेर गणपती मूर्ती ठेवल्याने साडेपाच लाखांचा दंड | पुढारी

वानवडी : सदनिकेबाहेर गणपती मूर्ती ठेवल्याने साडेपाच लाखांचा दंड

सुरेश मोरे

वानवडी(पुणे) : नवी सदनिका 2002 मध्ये घेतल्यानंतर होनावर कुटुंबीयांनी श्रध्दास्थान म्हणून गणपतीची मूर्ती घराबाहेरील कोपर्‍यात ठेवली होती. मूर्ती घराबाहेर बसविल्यामुळे या कुटुंबीयांना तब्बल 20 वर्षानंतर सोसायटीकडून 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंडाची रक्कम व सोसायटीच्या तगाद्यामुळे हे ज्येष्ठ दाम्पत्य हवालदिल झाले आहे.

संध्या होनावर (74) व त्यांचे पती सतीश होनावर (77) हे वानवडीतील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये राहतात. 2002 मध्ये या कुटुंबीयांनी या सोसायटीत सातव्या मजल्यावर 702 नंबरची सदनिका विकत घेतली. त्या वेळी कागदापासून बनविलेली गणपती बाप्पांची जवळपास तीन ते साडेतीन फुटांची मूर्ती त्यांनी सदनिकेच्या बाहेरील कोप-यात ठेवली आहे.

तिची नियमाने पूजाही करत असल्याचे होनावर यांनी सांगितले. सतीश होनावर हे 2002 पासून याच सोसायटीचे सदस्य होते, तर 2016 ते 18 या कालावधीमध्ये या सोसायटीचे चेअरमन होते. मात्र त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2019 ला सोसायटीवर नवीन बॉडी आली आणि त्यानंतर नवे नियम आले. सदनिकेच्या बाहेर असणार्‍या लॉबीमध्ये (मोकळ्या) जागेत चप्पल कुणी काढायची नाही, झाडांच्या कुंड्या किवा अडगळीचे सामान ठेवायचे नाही.

ठेवल्यास महिन्याच्या टॅक्सच्या पाचपट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल, असा फतवा सोसायटीने काढला. या फतव्यामध्येच आमची गणपतीची मूर्ती बाहेर ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपये दंड आमच्यावर लादण्यात आला असल्याचे संध्या होनावर यांनी सांगितले. एवढा मोठा दंड आणि मानसिक त्रास होत असल्याने आम्ही मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे तक्रार केल्याचे होनावर कुटुंबीयांनी सांगितले. जोपर्यंत फायनल ऑर्डर येत नाही तोपर्यंत सोसायटी दंड आकारू शकत नाही, असे सहकार न्यायालयाने स्पष्ट केल्याचे होनावर यांनी सांगितले.

जीव गेला तरी बेहत्तर, बाप्पांची मूर्ती ठेवल्या ठिकाणावरून हलविणार नाही. मी ज्या मजल्यावर राहतो त्या ठिकाणी असलेल्या लोकांना मूर्तीचा त्रास नाही. उलट ते लोक दिवाबत्ती करतात. मग सोसायटी बॉडीलाच का त्रास वाटतो? आमचा शेवटचा मजला आहे. तीन सदनिकेतील लोकच इथे वावरतात.

-सतीश होनावर, सदनिकाधारक

हा विषय सोसायटीचा आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यावर काहीही भाष्य करू इच्छित नाही.

– जाफरभाई मसालावाला,
अध्यक्ष, फ्लॉवर व्हॅली

फ्लॉवर व्हॅली सोसायटी प्रशासनाने संध्या होनावर यांना केलेला दंड व नोटीस परत घ्यावी व वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा सोसायटीचेअरमन यांच्या घरासमोर बाप्पांच्या मूर्तीची वाजतगाजत स्थापना करू.

– साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे

घराच्यासमोरील लॉबीमध्ये अतिक्रमण केलेले असल्याचे, फ्लॉवर व्हॅली सोसायटीने आम्हास पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, गणपतीची मूर्ती बसविल्याचा यात कोणताही उल्लेख नाही.

– डी. एस. हौसारे, उपनिबंधक

हेही वाचा

पुणे : वाहतुकीच्या सर्वाधिक तक्रारी; पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर समस्यांचा पाऊस

मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला मिळणार संधी? यांची नावे चर्चेत

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

Back to top button