देशाविरुद्ध कट रचल्याप्रकरणी ४ दहशतवाद्यांना १० वर्षांची शिक्षा | पुढारी

देशाविरुद्ध कट रचल्याप्रकरणी ४ दहशतवाद्यांना १० वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  देशाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपावरून दिल्लीच्या ‘एनआयए’ न्यायालयाने ‘इंडियन मुजाहिद्दीन’चे चौघे दहशतवादी अनुक्रमे दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या सोमवारी या सर्वांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आरोपींनी 7 जुलै रोजी गुन्हा कबूल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

‘एनआयए’ म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने सप्टेंबर 2012 मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौघेही दोषी ‘इंडियन मुजाहिद्दीन’शी संबंधित असून, या संघटनेवर देशाच्या विविध भागांत दहशतवादी कारवायांचा कट रचल्याचा आरोप आहे.

बॉम्बस्फोटांसाठी भरती

आरोपींनी देशाच्या विविध भागांत विशेषतः दिल्लीत गुन्हेगारी कट, बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन सदस्यांची भरती केली. यामध्ये पाकिस्तानस्थित स्लीपर सेलकडून येणार्‍या मदतीचाही समावेश होता. दहशतवादी कारवायांसाठी या चौघांना परदेशातून हवाला माध्यमातून पैसा मिळत होता. बाबरी मशीद विध्वंस, गुजरात दंगल आणि मुस्लिमांवरील इतर कथित अत्याचाराबद्दल सांगून मुस्लिम तरुणांना हे चौघे दहशतवादी कारवायांमध्ये भरती करत होते.

‘सिमी’ची शाखा

2007 मध्ये कर्नाटकातील भटकळ येथे स्थापन झालेली ‘इंडियन मुजाहिद्दीन’ ही संघटना ‘सिमी’ची शाखा मानली जाते. या संघटनेला 2010 मध्ये विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते. ‘सिमी’ म्हणजे स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया. 2001 मध्ये ‘सिमी’वरही बंदी घालण्यात आली होती.

Back to top button