लोणी धामणी : पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात! | पुढारी

लोणी धामणी : पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात!

लोणी धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुलै महिना अर्ध्यावर आला तरी पाऊस नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी-धामणी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. काही भागांत झालेली पेरणीदेखील आता वाया जात आहे. दुसरीकडे शिरदाळे आणि परिसरात बटाटा लागवड रखडली आहे. सुरुवातीला थोडा रिमझिम पाऊस झाला. त्यावरच शेतकर्‍यांनी पेरणी केली होती. परत पाऊस होईल या आशेने केलेली ही पेरणी मातीत गेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस नाही.

सुरुवातीला होणारा वळीव पाऊस यंदा झाला नाही. त्यामुळे चार्‍याचा प्रश्नदेखील गंभीर रूप घेत आहे. मका, भुईमूग, पाला अशा खाद्यांसाठी शेतकरी वणवण फिरत आहे. त्यात उसाचे वाढे काही प्रमाणात उपलब्ध होईल, तसे आणले जात आहे. परंतु वाढेदेखील जास्त प्रमाणात उपलब्ध होत नसून, ते शेतकर्‍यांना पुरवताना कसरत होत असल्याचे वाढे विक्रेते आणि शेतकरी रंगनाथ जाधव यांनी सांगितले.

दुसरीकडे शिरदाळे येथे होणारी बटाटा लागवड यंदा मोठ्या प्रमाणावर घटली आहेच. शिवाय ज्यांनी बियाणे आणले तेदेखील पावसाच्या प्रतीक्षेत घरात पडून आहे. काही शेतकर्‍यांनी त्याची लागवड केली आहे. परंतु पाऊस झाला नाही, तर तेदेखील खराब होतील असे लागवड केलेले शेतकरी बाबाजी चौधरी, निवृत्ती मिंडे, कांताराम तांबे, कचर तांबे या शेतकर्‍यांनी सांगितले.

अशीच परिस्थिती लोणी, धामणी, पहाडदरा परिसरात असून, लवकर पाऊस झाला नाही, तर शेतकर्‍यांवर खूप वाईट वेळ येईल, असे शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर, महेंद्र वाळुंज, शिरदाळेचे उपसरपंच मयूर सरडे, धामणीचे ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, माजी सरपंच मनोज तांबे यांनी सांगितले.

चालू वर्षी पाऊस खूप लांबला आहे. त्यामुळे पेरणी केलेले पीक वाया जाण्याची भीती आहेच शिवाय पाणीटंचाई, चाराटंचाई ही समस्या मोठ्या प्रमाणावर उभी राहू शकते. त्यामुळे शासनाने जनावरांच्या चार्‍यासाठी काही तरी सुविधा करावी, जेणेकरून त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. पुढील आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर सर्वत्र टँकर पुरवावे लागतील.

मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे

हेही वाचा

वानवडी : सदनिकेबाहेर गणपती मूर्ती ठेवल्याने साडेपाच लाखांचा दंड

पुणे : वाहतुकीच्या सर्वाधिक तक्रारी; पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर समस्यांचा पाऊस

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

Back to top button