पुणे : ‘टेमघर’ही यंदा हक्काचे; दुरुस्तीसाठी धरण रिकामे होणार नाही!

पुणे : ‘टेमघर’ही यंदा हक्काचे; दुरुस्तीसाठी धरण रिकामे होणार नाही!
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे : खास पुण्यासाठी बांधलेल्या टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात उपाययोजना होऊनही भिंतीतून झिरपत असलेले पाणी थांबविण्यासाठी या वर्षभरात मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे लागणार आहे. तरीही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे येत्या पावसाळ्यात प्रथमच दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण पूर्णपणे रिकामे करण्याची वेळ येणार नसल्याने 2023 च्या उन्हाळ्यात पुणेकरांना हक्काचे पाणी मिळणार आहे.

खडकवासला धरणसाखळीत सुरुवातीला वरसगाव (क्षमता 12.82 अब्ज घनफूट-टीएमसी), पानशेत (क्षमता 10.62 टीएमसी) आणि खडकवासला (1.97 टीएमसी) एवढी धरणे होती. या धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी, तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र, पुण्याला किती पाणी द्यायचे आणि शेतीला किती, याबाबतचा वाद कायमच होत होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी पुण्याला हक्काचे एक धरण असावे, अशी कल्पना मांडण्यात आली आणि मुठा नदीच्या उगमाजवळ 3.73 टीएमसी क्षमतेच्या टेमघर धरणाची निर्मिती करण्यात आली.

तत्कालीन अभियंते व कत्राटदरांवर गुन्हे

सुमारे साडेतीनशे कोटी खर्चून टेमघर धरण बांधण्याचे काम 1997 मध्ये सुरू करण्यात आले. ते 2010 मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले खरे, पण बांधकाम झाल्यावर अवघ्या सहा वर्षांतच म्हणजे 2016 पासून त्यातून गळती होऊ लागली. ही गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात आल्याने धरणात साठलेले पाणी प्रथम सोडून कामासाठी धरण रिकामे करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुण्याला हक्काचे पाणी मिळण्याची सोय बंद झाली. नव्या कोर्‍या टेमघरच्या भिंतीतून पाण्याची मोठी गळती सुरू झाल्याने तत्कालीन अभियंते आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले; तसेच गळतीबाबतही चौकशी सुरू करण्यात आली.

ही गळती कशी थांबवायची, याबाबत खडकवासला येथील केंद्रीय जलऊर्जा संशोधन संस्था म्हणजेच सीडब्ल्यूपीआरएसचा सल्ला घेण्यात आला. रानडे समितीही नेमण्यात आली. त्यांच्या शिफारशींनुसार धरण मजबुतीकरणाच्या कामासाठी 98 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येऊन काम सुरू करण्यात आले. या कामामुळे गळती नव्वद टक्क्यांपर्यंत थांबली आहे. मात्र, उर्वरित दहा टक्के गळतीसाठी आणखी काम करावे लागणार आहे. त्यासाठी खात्याने येत्या अंदाजपत्रकात 50 कोटींची मागणी केली आहे. ते काम येत्या वर्षभरात सुरू होईल आणि 2023 च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. धरणातील गळती थांबविण्याचे काम पूर्ण होण्यास आणखी दीड वर्ष लागणार असले तरी, आतापर्यंतच्या कामामुळे येत्या पावसाळ्यात धरण सुरुवातीला रिकामे करावे लागणार नाही, असे विशेष प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी 'पुढारी'ला सांगितले.

पुण्याला काय फायदा?

उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाले की उरलेले पाणी शेतीला द्यायचे की पुण्याच्या पाण्यात कपात करायचे, याबाबतचा वाद दरवर्षी होतो. पुण्यासाठी स्वतंत्र धरण झाल्याने टेमघर धरणातील पाणी पुण्यासाठी राखून ठेवता येईल आणि पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news