नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारतासाठीची लढाई कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत नव्हे तर वर्ष २०२४ मध्ये लढली जाणार आहे. साहेबांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी) हे माहीत आहे आणि त्यामुळेच ते मनोवैज्ञानिक लाभ घेण्यासाठी राज्यांच्या निवडणूक निकालाचा लाभ घेत उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला कोणीही बळी पडू नये अथवा खोट्या कथेचा हिस्सा बनू नये, असे प्रतिपादन राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे केले.
पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपने चमकदार कामगिरी केली आहे, त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना किशोर यांनी भारतासाठीची खरी लढाई २०२४ साली म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी होणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना या निकालाने २०२४ चे निकाल निश्चित केले असल्याचा उपरोधिक टोला विरोधकांना उद्देशून मारला होता. त्याचा संदर्भ देत प्रशांत किशोर यांनी वरील ट्विट केले आहे.
राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर प. बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेससोबत होते. त्यानंतर सध्या ते विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. अलीकडेच किशोर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेससाठी व्यूहरचना आखली होती. निकाल येईपर्यंत त्यांनी गोव्यातच ठाण मांडले होते.