

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : राज्यासह संपूर्ण देशात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा प्रयोग प्रत्यक्षात साकारून उसाचे उत्पादन वाढण्यासाठी सूर्यप्रकाश एक महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून एकरी ४०० मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असा दावा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी केला आहे.
याबाबत काळे यांनी सांगितले, काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते यासाठी प्रतिएकरी ३५ ते ४० हजार उसाची संख्या असावी, तसेच प्रत्येक उसाचे वजन २.५ ते ३ किलो असावे, जेणेकरून प्रतिएकरी १०० टन ऊस उत्पादन मिळते. यासाठी पट्टा पद्धत, ऊस रोपांचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर, वेगवेगळ्या फवारण्या आदींचा उपयोग केल्यास एकरी १०० टन उत्पादन मिळू शकते. परंतु, असा जोपासलेला ऊस ७ ते ८ महिन्यानंतर वाऱ्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे संपूर्णतः जमीनलगत पडतो.
पडलेल्या उसास उंदराचा प्रादुर्भाव होतो तर त्यामुळे ठिबक सिंचनाचे पाइप दबून पाणी देण्यास अडचण होते. पडलेला ऊस जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. ऊस हे बेटवर्गीय पीक असल्यामुळे बेटातील २० टक्क्यांपर्यंतच्या उसास सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्या ठिकाणी त्याची वाढ थांबते. पडलेल्या उसास खूप प्रयत्न करून जिवंत राहावे लागते यामध्ये उसाची ६० टक्के ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा उसाचे वजन २ ते ३ किलोपेक्षा जास्त मिळणे खूप जिकिरीचे ठरते.
एकूणच सूर्यप्रकाश हा ऊस उत्पादन वाढण्यासाठी प्रमुख घटक असल्याचे मत काळे यांनी व्यक्त केले. ऊस पिकासाठी १०० टक्के सूर्यप्रकाश मिळाल्यास एकरी ४०० टन उत्पादन मिळू शकतो, याची कल्पना सुचली. स्टेजिंग करून उसाला पडण्यापासून वाचवले आणि ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिकचे उत्पादन मिळू शकते. यावर स्वतः खर्च करून स्वतःच्या १३ गुंठे क्षेत्रावर प्रयोग करण्याचे ठरविले. जेथे पीक घेतले ती जमीन क्षारयुक्त असून, जवळपास १३०० टीडीएस असणारे पाणी अशा क्षेत्रांमध्ये स्टेजिंग पद्धत वापरून ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. सध्या या उभ्या असलेल्या उसाचे पीक पाहता व पहिलेच पीक घेताना झालेल्या चुकांची दुरुस्ती केल्यास जवळपास एकरी ४०० टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असे मत काळे यांनी व्यक्त केले.
- प्रतिएकरी गाळपास ५० हजार ऊस उपलब्ध होतात.
- प्रत्येक उसाचे वजन ८ ते १२ किलोपर्यंत मिळू शकते.
- उसाच्या प्रत्येक बेटापर्यंत जाता येत असल्याने ठिबक सिंचनासह, रोग व कीड व्यवस्थापन १०० टक्के करणे शक्य.
- एक वेळेस ऊस लागवड केल्यानंतर कमीत-कमी उसाचे पुढे ५ ते ७ खोडवे पीक घेणे शक्य.
- उसाला एकदा स्टेजिंग केलेला खर्च पुढे १५ ते २० वर्षापर्यंत करण्याची गरज नाही.
मी माझ्या घरासमोर सन २०१८ मध्ये ३० स्क्वेअर फुट जागेत एक डोळा पद्धतीने ६ उसाच्या टिपऱ्यांची लागवड केली होती. आज ७ वर्षानंतर देखील त्याचे खोडवे व्यवस्थितरीत्या येत आहेत. आज तो ऊस २२ ते २३ फुटापर्यंत वाढलेला आहे. या स्टेजिंगमधील उसाची प्रेरणा घेऊनच मी माझ्या शेतात १३ गुंठे क्षेत्रात स्टेजिंगचा वापर करून ऊस लागवड केली आहे. स्टेजिंग लागवडीचा उसाचा पहिलाच प्रयोग असल्याने काही चुका दुरुस्त केल्यास यशस्वी ठरून एकरी ४०० टन उसाचे उत्पादन मिळू शकेल. हा ऊस येत्या १० ते १२ दिवसात गाळपास जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी हा ऊस पाहण्यास आवर्जून भेट द्यावी.
सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, माळेगाव साखर कारखाना, बारामती
उसाला स्टेजिंग करणे म्हणजे ऊस वाढत असताना उसाला आधार देणे, ज्यामध्ये स्टीलच्या चॅनल चा उपयोग करून उसाच्या क्षेत्रात १२ बाय १२ फूट अंतरावर त्याचे बॉक्स तयार करणे जेणेकरून त्यामध्ये वाढलेला ऊस जमिनीवर न पडता त्याला आधार मिळाल्यास तो सरळ वाढून त्या उसाला १०० टक्के सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे त्याची निरोगी व जोमदार वाढ होऊन उसाचे भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होते.