

पुणे : एक काल्पनिक धमकी गृहीत धरून लष्कर आणि नागरिकांच्या एकत्रीकरणामुळे शस्त्रूचा बीमोड कसा करता येतो याचे सुंदर प्रात्यक्षिक दक्षिण कमांडच्या पुढाकाराने बघायला मिळाले. डावपेच, तंत्र आणि कार्यपद्धती मिलाफ बघून नागरिक थक्क झाले.
पुणे येथील लष्करी-नागरी एकत्रीकरण (एमसीएफ) प्रशिक्षण केंद्रात लष्करी-नागरी एकत्रीकरण सराव आयोजित करण्यात आला होता. यामुळे गुंतागुंतीच्या आणि आकस्मिक परिस्थितींविरुद्ध एकीच्या बळाने कशी मात करता येते, याचाच संदेश यातून देण्यात आला.
दक्षिणी कमांडच्या जवानांनी फोर्स वन (महाराष्ट्र पोलिस), दहशतवादविरोधी पथक ( एटीएस ), पोलिस युनिट्स, अग्निशमन दल, बॉम्बशोधक पथक, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आरोग्य आणि न्यायवैद्यक विभाग आणि लष्करी श्वान पथकासोबत एकत्रितपणे समन्वय साधला. या सरावामध्ये धोक्यांच्या श्रेणीमध्ये आंतरकार्यक्षमता, जलद निर्णयक्षमता आणि समन्वित प्रतिसादांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या सरावाद्वारे आदेश आणि नियंत्रण यंत्रणा, दळणवळण रचना आणि विविध स्तरांवरील आंतर-एजन्सी समन्वय तपासण्यासाठी वास्तववादी संकट परिस्थितीचे अनुकरण करण्यात आले. यामुळे सहभागी एजन्सींना प्रमाणित कार्यप्रणाली सुधारण्यास, कार्यात्मक समन्वय ओळखण्यास आणि जलद व प्रभावी प्रतिसादासाठी संस्थात्मक संबंध मजबूत करण्यास मदत झाली.