

पुणे : शहरामधील मंगळवार पेठ भागातील सुमारे 8 हजार 900 चौरस मीटर जागा महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एमएसआरडीसीकडून खासगी विकासकाला जमीन सोडण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
ही जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असल्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही जमीन परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
एमएसआरडीसी आणि एनजी वेंचर्स यांच्यात 4 सप्टेंबर 2024 रोजी जमिनीचा भाडेपट्टा करार करण्यात आला होता. मात्र, ही जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित आहे. या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा व आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या मध्यस्थीने संघटनांचे पदाधिकारी, नगरविकास विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग यांच्यात वेळोवेळी बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला.
त्यानंतर महामंडळाने एनजी वेंचर्स यांना पाठविलेल्या पत्रानुसार 15 दिवसांच्या आत एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले. पहिल्या पर्यायानुसार, कंपनीने भरलेले प्रीमियम, भाडे तसेच अनामत रक्कम एमएसआरडीसीकडून परत करण्यात येणार आहे, तर दुसर्या पर्यायानुसार, एमएसआरडीसीच्या ताब्यात असलेली अन्य कोणतीही पर्यायी जमीन वाटप करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. दरम्यान, वारंवार करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, संबंधित खासगी संस्थेकडून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा गोर्हे यांनी व्यक्त केली.