

पुणे : राज्याच्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदाच्या वेतनश्रेणीच्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच अधिकारी, कर्मचार्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर विचार करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
भूमिअभिलेख विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विजय पिसाळ, सरचिटणीस अजित लांडे, विदर्भ विभगाचे अध्यक्ष श्रीराम खिरेकर तसेच राज्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, भूमिअभिलेख विभागाकडील भूकरमापक पदाच्या वेतनश्रेणीच्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी संवर्गाप्रमाणे प्रवास भत्ता देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
या बैठकीत भूमिअभिलेख विभागातील कर्मचार्यांच्या पदोन्नती, आकृतीबंध, अनुकंपा भरती, सरळसेवा भरती, कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेवाज्येष्ठता यादी याबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात विभागाने गतीने कार्यवाही करावी.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनुसार लवकर आकृतीबंध, वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी स्तरावर असून, त्यास लवकरच मान्यता मिळणार आहे.
अजित लांडे, सरचिटणीस, राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग.