

नवी सांगवी(पिंपरी); पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण असलेल्या पिंपळे गुरव येथील टपाल कार्यालयात येणार्या नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. टपाल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच येथे येणारे ग्राहक यांना जागा अपुरी पडत असल्याने कामकाज दाटीवाटीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणामुळे टपाल कार्यालयात ग्राहक पाकिटे खरेदी करण्यासाठी, पाकिटे स्पीड पोस्ट करण्यासाठी गर्दी करत आहेत. कार्यालयात व कार्यालयाच्या बाहेर इमारतीच्या पायर्यांवर नागरिक रांगेत उभे असल्याचे चित्र पहावयास
मिळत आहे.
टपाल कार्यालयात स्पीड पोस्ट, तिकिटे खरेदी, बचत खाते, सुकन्या बचत खाते, पार्सल आदी कामकाजासाठी ग्राहक कार्यालयाच्या वेळेत येत असतात. कार्यालयात येणार्या ग्राहकांसाठी केवळ चार बाय चार आकाराची म्हणजेच साधारण आठ ग्राहक उभे राहण्या इतपत जागा आहे. अधिक आल्यास कार्यालयाबाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. टपाल कार्यालयात अधिकारी, कर्मचार्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय असून नसल्यासारखी आहे.
स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने तळ मजल्यावर कर्मचारी वर्ग तर महिला अधिकारी, कर्मचारी दवाखान्यातील स्वच्छतागृहचा वापर करीत आहे. तोकड्या जागेत कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस येथील टपाल कार्यालय समस्यांच्या विळख्यात गुंतत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता स्मार्ट सिटी सारख्या परिसरात टपाल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
पालिकेच्या शेवंताबाई सहादू काशिद या शासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर टपाल कार्यालय आहे. इमारतीचा जिना अरुंद असल्यामुळे ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. टपाल कार्यालयात आलेल्या नागरिकांची कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभे राहिल्याने आणखी भर पडत आहे. तळमजल्यावर महापालिकेचे आरोग्य विभाग आहे. पहिल्या मजल्यावर पोस्ट ऑफिस, दुसर्या मजल्यावर वैद्यकीय विभाग, तिसर्या मजल्यावर व्यायाम शाळा आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कर्मचारी, नागरिक व रुग्णांची सतत वर्दळ सुरू असते. गर्दीमुळे ये-जा करताना येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा