परभणी : मानवत तालुक्यात अग्रीम पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन | पुढारी

परभणी : मानवत तालुक्यात अग्रीम पिकविम्यासाठी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन

मानवत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सर्व मंडळाचा पीकविमा अग्रीम वेतनमध्ये समावेश करावा या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्रित झाले आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. २८) तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले.

याबाबत माहिती अशी की, संपूर्ण मानवत तालुक्यात महिनाभरापासून पावसाचा खंड पडला असून दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतातील पिके सुकून जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला असून देखील पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना अग्रीम वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच तहसील प्रशासनाने पर्जन्यमापाची आकडेवारी चुकीची दाखवली असल्याने पीकविमा कंपनी अग्रीम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत विविध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन आंदोलन केले.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे गोविंद घंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव काळे, बीआरएसचे प्रा. प्रकाश भोसले, हनुमान मसलकर, मनसेचे दत्तराव शिंदे, माकप किसानसभेचे लिंबाजी कचरे, युवासेनेचे कृष्णा शिंदे, राष्ट्रवादी युवक चे माऊली आंबेगावकर, बालासाहेब निर्मळ, सुरज काकडे, लक्ष्मण शिंदे आदीजण सामील झाले होते.

आठ दिवसात निर्णय घेऊ तहसीलदार

मानवत तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडला असून आंदोलनकर्त्यांच्या मागणीबाबत संबंधित विमा कंपनीचे अधिकारी व कृषी विभागाशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर येत्या आठ दिवसात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी आंदोलनादरम्यान दिले.

Back to top button