

वडगाव मावळ(पिंपरी) : मावळ तालुक्यात मुंबई-पुणे महामार्गालगतची हॉटेल, ढाब्यांसह ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू आहे. ड्राय डे असो अथवा काहीही असो तालुक्यात दारूचा महापूर सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने अवैध दारूविक्री सुरू असल्याची चर्चा आहे.
तालुक्यात पुणे-मुंबई महामार्गाच्या दुतर्फा सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कान्हे फाटा, कामशेत, कार्ला, लोणावळा अशा सर्वच भागांत हॉटेल व ढाब्यांची संख्या सुमारे 400 ते 500 पर्यंत आहे. यापैकी जेमतेम हॉटेलना बार-रेस्टॉरंटचा अधिकृत परवाना आहे. अधिकृत परवाना नसलेल्या हॉटेलपैकी निवडक मांसाहारी हॉटेल सोडली तर इतर सर्व ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री
सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला ड्राय डे असताना यादिवशी तालुक्यातील अधिकृत, अनधिकृत अशा बहुतांश सर्व हॉटेल्स, बिअर शॉपी, वाईन शॉपवर दारूविक्री चढ्या दराने सुरू होती. परंतु, यादिवशी उत्पादन शुल्क विभागाकडून एकही कारवाई करण्यात आलेली नाही हेही विशेष आहे.
तालुक्यात सन 2023-24 मध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत अनुज्ञाप्ती म्हणजे अधिकृत परवानाधारक दारूविक्री करणार्या दुकानांची संख्या 190 असून या दुकानांद्वारे 2 कोटी 95 लाख 53 हजार 340 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, अनधिकृतपणे दारू विक्री करणार्या हॉटेल, ढाब्यांकडून प्रशासनाला स्वतंत्र महप्ताफ दिला जात असल्याचे एका हॉटेल मालकाने सांगितले. यामाध्यमातून दरमहा लाखो रुपयांचे हप्तावसुली होत आहे.
हेही वाचा