पिंपरीतील दिव्यांग भवनाचे 2 ऑक्टोबरला उद्घाटन | पुढारी

पिंपरीतील दिव्यांग भवनाचे 2 ऑक्टोबरला उद्घाटन

पिंपरी(पुणे) : महापालिकेच्या वतीने मोरवाडी, पिंपरी येथे दिव्यांग भवन बांधण्यात आले आहे. या चार मजली इमारतीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. या भवनाचे उद्घाटन 2 ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर दिव्यांग भवन बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. महत्वाचा प्रकल्प म्हणून अर्थसंकल्पात विशेष तरतूदही करण्यात आली. चार मजली इमारतीमध्ये 24 हजाार चौरस फुटांचे बांधकाम आहे. बांधकामासाठी 4 कोटी 68 लाख 41 हजार खर्च झाला आहे. दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 3 कोटी 37 लाख 12 हजार खर्च झाला आहे. महपाालिका अर्थसंकल्पात भवनासाठी 12 कोटी 70 लाखांची तरतूद आहे.

विविध कारणांमुळे भवनाचे काम रखडले. पाच वर्षे उलटूनही भवन तयार झाले नसल्याने दिव्यांग बांधव नाराजी व्यक्त करीत आहेत. अखेर, भवनाचे काम पूर्ण झाले आहे. दिव्यागांचे साहित्य व सेवा उपलब्ध करून देणे आणि जोडणीचे काम सुरू आहे. इमारतीमध्ये कार्यालय, सभागृह, स्टाफ रूम, स्वच्छतागृह आदी सुविधा आहेत. कामकाजासाठी मनुष्यबळ असणार आहे. या भवनाचे उद्घाटन येत्या 2 ऑक्टोबरला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

दिव्यांग भवनातील सुविधा

डोळे तपासणी, भाषा संवाद रूम, संभाषण थेरपी, समुपदेशन कक्ष, संगीत थेरपी अशा वेगवेगळ्या माध्यमातून दिव्यांग बांधवावर उपचार केले जाणार आहेत. विविध उपचारात्मक शिक्षण दिले जाणार आहे. व्यावसायिक व उद्योग प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र असणार आहे. व्यक्तिमत्व विकास, स्मार्ट क्लासरूम तसेच, विविध केंद्र व कक्ष असणार आहेत. ऑटिझम थेरपी व ऑडिओ लॅब असणार आहे. विविध 14 प्रकाराच्या तज्ज्ञांच्या वतीने दिव्यांगांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे..

कंपनीद्वारे कामकाज

दिव्यांग भवनासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीप्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यात समाज विकास विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. कंपनीमार्फत दिव्यांग भवनाचे कामकाज केले जाईल. पालिकेने आतापर्यंत सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधार योजना आदींसाठी कंपनी स्थापन केली आहे. त्याचे कामकाज कंपनीमार्फत सुरू आहे.

राज्यातील पहिले दिव्यांग भवन

राज्यातील हे पहिले दिव्यांग भवन असणार आहे. दिव्यांगांच्या अद्ययावत व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तेथे दिव्यांगांवर उपचारासह व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाईल. तज्ज्ञांकडून समुपदेशनही केले जाईल. त्याचा फायदा बालक, तरूण-तरूणी, प्रौढ व ज्येष्ठ दिव्यांगांना होणार आहे.

पालिकेचा दिव्यांग कक्षही या भवनात

महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कक्ष त्या भवनात सुरू करण्यात येणार आहे. तेथून दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. शहरात 8 हजार दिव्यांग बांधव असल्याची महापालिकेकडे आकडेवारी आहे. त्यात बालकांपासून ते ज्येष्ठांच्या समावेश आहे. पालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दरमहा पेन्शन, व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास, अर्थसहाय आदी योजना समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येतात.

हेही वाचा

‘ती’ सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होणार ?

कांदाप्रश्नी राजगुरुनगरला ‘रास्ता रोको’

पिस्तुलातून सुटली गोळी अन् गेला चिमुकल्याचा बळी!

Back to top button