

पुणे : शहर व परिसरातील मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या काठावरील वृक्षांची कत्तल महापालिका प्रशासन करीत आहे, ती अवैध असून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग करणारी आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका प्रशासनाला या वृक्षतोडीपासून रोखावे अशा आशयाची तक्रार शहरातील केंद्रीय सक्षमीकरण समितीच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे.(Latest Pune News)
शहरातील पर्यावरणप्रेमींच्या वतीने ही तक्रार करण्यात आली असून, केंद्रीय सक्षमीकरण समितीचे अध्यक्ष सिद्धांत दास यांच्या स्वाक्षरीने हे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. ही समिती शहराच्या नदीपात्राबाजूला असणारी जुनी जैवविविधता वाचविण्यासाठी सतत लढा देत आहे, त्यामुळे अनेक मुद्दे या पत्रात नमूद करीत राज्याच्या मुख्य सचिवांचे लक्ष वेधले आहे.
पुणे येथील मुठा, मुळा, इंद्रायणी व पवना या नद्यांच्या काठावरील वनक्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा.
सदर्भ : सर्वोच्च न्यायालयातील याचिका 4 मार्च 2025, प्रकरण क्रमांक 1164/2023 - अशोक कुमार शर्मा, भारतीय वनसेवा (सेवानिवृत्त) व अन्य विरुद्ध भारत संघ व अन्य.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वरील आदेशांकडे दुर्लक्ष करून पुण्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी व पवना नद्यांच्या परिसरातील घोषित वने तोडण्याची योजना राबविली जात असल्याचे दिसून येते. याकडे तातडीने लक्ष देऊन दाट वनस्पती व वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी.
चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाच्या वरील प्रकरणातील (1164/2023) आदेशांचे पालन होईपर्यंत सर्व प्रस्तावित झाडतोडी थांबविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयास दिलेल्या कालमर्यादेत शपथपत्राद्वारे सादर होईपर्यंत कोणतीही झाडतोड होऊ नये.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना अंतरिम निर्देश द्यावेत की, त्यांनी मुळा व मुठा नद्यांच्या काठावरील वृक्षांना कोणतीही हानी पोहोचवू नये किंवा त्यांची तोड करू नये, जोपर्यंत या क्षेत्रांचे ओळख व सीमांकन पूर्ण होत नाही.
विशेषतः रिव्हर फंट डेव्हलमेंट प्रोजेक्टअंतर्गत 1009 झाडे तोडण्याचा आणि 2252 झाडे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असलेल्या प्रकल्पासंबंधी ही खबरदारी आवश्यक आहे. हा प्रकल्प सूर्या हॉस्पिटल ते वाकड-कास्पटे वस्ती (स्मशानभूमी) ते इंगवले घाट, पिंपळे निलख, जुना सांगवी पूल या भागात आहे.
महाराष्ट्रात स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने मुळा-मुठा नदीकाठच्या परिसराचा सखोल व प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा व डीम्ड फॉरेस्ट श्रेणीत समाविष्ट करण्यास पात्र अशा भागांची ओळख करावी. महाराष्ट्रातील तज्ज्ञ समितीने नागरी संस्था व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व प्रतिनिधित्वांचे व्यापक पुनरावलोकन करून संभाव्य वनक्षेत्रांविषयी संपूर्ण अहवाल तयार करावा. मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीकाठावर सुरू असलेल्या वृक्षतोडीची ही प्रत्यक्षातील छायाचित्रे तक्रारदारांनी पत्राला जोडली आहेत.