

पुणे : बांधकाम परवानगी, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन, विधी अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी असलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांची केवळ सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) चे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रन यांच्या जागेवर आयएएस अधिकारी श्रीमती पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Latest Pune News)
सात महिन्यांपूर्वीच पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून चंद्रन यांनी पदभार स्वीकारला होता. प्रदीप चंद्रन यांच्याकडे बांधकाम परवानगी, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन, विधी आशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात या विभागांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी दिसून आली नाही. त्यांच्या कालावधीत झालेल्या बदल्या, तसेच ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स संबंधित काही प्रकरणांवर दबक्या आवाजात चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीकडेही प्रशासकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थाने पाहिले जात आहे. दरम्यान, काही निविदा प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका देखील त्यांच्या बदलीसाठी कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
दरम्यान, चंद्रन यांच्या जागी नियुक्ती झालेल्या पवनीत कौर यांनी पुणे विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. कौर या 2014 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या यशदामध्ये उपसंचालक असून यापूर्वी त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी आणि पुण्यातील ट्रायबल रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.