

पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकासह आणखी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील धायरी, तसेच अहिल्यानगर रोडवरील लोणीकंद भागात अपघाताच्या घटना घडल्या. या प्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (Latest Pune News)
धायरीतील डीएसके विश्व रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश गणपत लांडगे (वय ७३, रा. केंद्रे काॅम्प्लेक्स, काका चव्हाण शाळेसमोर, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांडगे यांच्या मुलीने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे हे ३० सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या रस्त्यावरील डीएसके विश्व सोसायटी रस्त्यावर असलेल्या गणपती मंदिर परिसरात बागकाम करत होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लांडगे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लांडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी एस. के. भापकर तपास करत आहेत.
तर नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. तोयाबहाद्दुर किनबहाद्दुर थापा (वय ४८, सध्या रा. लोणीकंद) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. थापा हे हाॅटेल कामगार आहेत. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास थापा लोणीकंद परिसरातून निघाले होते. दुपारी चारच्या सुमारास चंद्रमा हाॅटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या थापा यांना भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.