

पुणे: भूमिअभिलेख विभागात भूकरमापकांची सरळसेवेने 903 पदांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाइन 37 हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे. (Latest Pune News)
भूमिअभिलेख विभागात दोन वर्षांपूर्वी सुमारे बाराशेहून अधिक पदांची भरती राज्य शासनाने खासगी एजन्सीव्दारे परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात आली होती. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती. त्यानुसार काही उमेदवार संबंधित ठिकाणी रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची अनेक पदे पुन्हा रिकामी झाली. परिणामी, मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू लागली.
ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी भूकरमापकांच्या पदभरतीसाठी राज्य शासनाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर एका खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली. हे अर्ज उमेदवारांकडून 1 ते 24 ऑक्टोबर यादरम्यान ऑनलाइन मागविण्यात आले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहेत.