

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून (दि. १६) सुरू होत आहे. दहावीच्या ४८ हजार ७२३, तर बारावीच्या १ लाख ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती या विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा आयोजित केली आहे. त्यात दहावीची परीक्षा १६ ते ३० जून, बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान होणार आहे.
राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजता, दुपारच्या सत्रात ३ वाजता प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेप्रमाणेच जून-जुलै २०२६च्या पुरवणी परीक्षेसाठीही पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी अशा परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात येतील.
त्याबाबतची लिंक आणि सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत, असे देखील डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.