

पुणे: सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण रद्द करून केंद्र सरकारच्या कायद्यानुसार स्वतंत्र पाच टक्के आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दिव्यांग विद्यार्थी गौरव मालक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत निर्णय देत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग उपोषण सोडणार नसल्याचे सांगण्यात आले.
मुख्य अडचणी आणि मागण्या
सध्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'समांतर आरक्षण' पद्धत लागू आहे. या पद्धतीमुळे प्रत्येक प्रवर्गातील अत्यंत मर्यादित जागांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक गरजू आणि पात्र दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहत असून, त्यांना शिक्षण घेताना मोठ्या आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समांतर आरक्षणामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
केंद्र शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी
केंद्र शासनाच्या 'दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६' मधील कायदेशीर तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र पाच टक्के आरक्षणाची व्यवस्था केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागानेही वसतिगृहांमध्ये समांतर आरक्षणाची जाचक अट रद्द करून स्वतंत्र पाच टक्के दिव्यांग आरक्षण तत्काळ लागू करावे.