

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरीगाव येथील कै. मारुती वाघेरे जलतरण तलावात मंगळवारी (दि. 10) चक्क नाग अवतरला. नाग फिरत असल्याने तेथील कर्मचार्यांची पाचावर धारण बसली होती. सुदैवाने तलावावर नागरिक व मुले नसल्याने दुर्घटना घडली नाही. महापालिकेचे शहरात एकूण 13 सार्वजनिक जलतरण तलाव आहेत. त्यातील सात जलतरण तलाव खासगी संस्थांना चालविण्यास देण्याची निविदाप्रक्रिया सुरू आहे. सध्या महापालिकेकडून हे तलाव चालविले जात आहेत. पिंपरीगावात पवना नदीकाठावर आडबाजूला हा जलतरण तलाव आहे. तेथे दररोज शेकडो नागरिक व मुले पोहण्यासाठी येतात.
कासारवाडी तलावावर क्लोरीन वायू गळतीचा प्रकार घडल्याने क्रीडा विभागाने सर्व तलाव बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सकाळनंतर पिंपरीगावातील तलाव बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोहण्यासाठी नागरिक आले नव्हते. केवळ 7 ते 8 कर्मचारी उपस्थित होते.
एका कर्मचार्यास तलावात दुपारी चारच्या वेळेस चक्क नागोबा फिरत असल्याचे दिसले. तो भीतीने गारठून गेला. नागोबा तलावात घुसल्याने सर्वच कर्मचार्यांची पाचावर धारण बसली होती. तातडीने सर्पमित्राला फोन करून बोलावून घेण्यात आले. सर्पमित्र विकास वडपिले याने त्याचा शोध घेतला. भिंतीच्या पत्र्याच्या फटीत नाग जाऊन बसला होता. पत्रा काढून त्याला बाहेर काढण्यात आले.
शिताफीने नाग पकडून पिशवीत बंद करण्यात आला. तो नाग ताम्हिणी येथील नैसर्गिक अधिवास किंवा कात्रज प्राणिसंग्रहायात सुरक्षितपणे सोडून देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सुदैवाने या वेळी पोहण्यासाठी तलावावर नागरिक व मुले उपस्थित नव्हती. अन्यथा नाग चावून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरीगाव जलतरण तलावात नाग आल्याची खबर कर्मचारी संजय वाघेरे यांनी दिली. मी ताबडतोब तेथे पोहोचलो. इंडियन क्रोबा जातीचा तो नाग होता. सुमारे 6 फूट लांब आहे. खूपच आक्रमक नाग आहे. त्याला सुरक्षितपणे पिशवीत भरले. उद्या त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. नदीकाठावर तलाव असल्याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा येथे साप आढळून आले आहेत, असे सर्पमित्र विकास वडपिले यांनी सांगितले.
हेही वाचा