आम्ही उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी एकसंध राहणार ! | पुढारी

आम्ही उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी एकसंध राहणार !

वडगाव मावळ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाभिमुख कर्तृत्वाचा प्रभाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असून, राजकीय जीवनामध्ये त्यांनी नेहमीच ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाठीशी आम्ही एकसंध राहणार असल्याचा विश्वास संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आढावा घेण्यासाठी वडगाव मावळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश ढोरे, बाबूराव वायकर, सुभाषराव जाधव, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हारगुडे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष विकी लोखंडे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, सुनील दाभाडे, महिलाध्यक्षा दीपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, राज खांडभोर, पंढरीनाथ ढोरे, रामदास वाडेकर आदी उपस्थित होते.

बबनराव भेगडे म्हणाले, की राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम मावळ तालुक्यातील राजकारणावर प्रत्येकवेळी झाला. परंतु, मावळ तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कधीही पक्षाच्या नेतृत्वाला मान खाली घालावी लागेल असे काम केले नाही. त्यामुळे मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांवर राज्यात नेतृत्व करणार्‍या नेत्यांनीही नेहमीच विश्वास ठेवला आहे, ही मावळातील कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे.

निष्ठावंतांना विविध पदांवर संधी मिळणार

गणेश खांडगे यांनी मावळ तालुक्यातील पक्षाच्या कामाचा आढावा मांडताना आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे तालुक्यात गतिमान विकास सुरू असून त्याच ताकदीवर पक्षातील कार्यकर्ते संघटना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून निष्ठावंत व क्रियाशील कार्यकर्त्यांना विविध पदांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगितले.

अजित पवारांच्या अभिनंदनाचा ठराव

मावळ तालुक्यातील सुकाणू समितीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा व तालुका पातळीवर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

हेही वाचा

Shekhar Singh : मी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार : शेखर सिंह

Crime News : तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

प्रत्येक राज्यात सायबर कमांडो विंग स्थापन होणार

Back to top button