

बारामती: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डाॅ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ बारामतीत शनिवारी (दि. १७) राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाची बैठक पार पडली. नगराध्यक्ष सचिन सातव यांनी मार्गदर्शन करत डाॅ. जाधव यांना उच्चांकी मतदान देऊ, अशी ग्वाही दिली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, शहर युवकाध्यक्ष अभिजित घाडगे, कार्याध्यक्ष संभाजी माने, रियाज शेख, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मेघराज माने यांच्यासह नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्ष सातव म्हणाले, की पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने बारामती शहर व तालुक्यात मोठी मतदार नोंदणी केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार पक्षाकडून नियोजन केले जात आहे. नगरसेवकांना प्रभागनिहाय जबाबदारी दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नका, गांभीर्याने काम करा, हे नेहमी सांगायचे.
त्यामुळे आजही बारामतीत कोणतीही निवडणूक असो, राष्ट्रवादीकडून ती चोख नियोजन करून यशस्वीपणे पार पाडली जाते. डाॅ. जाधव यांच्या रुपाने उच्चशिक्षित व पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आपल्याला लाभले आहेत. त्यांना उच्चांकी मतदान व्हावे, यासाठी राष्ट्रवादीकडून कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. शहराध्यक्ष ॲड. इंगळे म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः प्रचार कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
पदाधिकाऱ्यांकडून त्या वेळोवेळी माहिती घेत आहेत. पक्षाचे शहरातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रभागनिहाय याद्या तयार करून काम सुरू केले आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या खंबीरपणे आम्ही पाठीशी आहोत. या वेळी प्रचारपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विनायक महाडिक यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. राजेंद्र गलांडे, हनुमंत माने यांनी आभार व्यक्त केले.
महायुतीच्या उमेदवारांना जनता दल (सेक्युलर)चा पाठिंबा
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांना जनता दल सेक्युलरने जाहीर पाठिंबा दिला आहे. जनता दल सेक्युलर हा महायुतीचा घटक पक्ष असून, केंद्रात एनडीएसोबत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत सूचित केले असून, उमेदवारांनीही जनता दलाच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.