100th Marathi Literary Conference: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शंभरावे मराठी साहित्य संमेलन साधेपणाने होणार

नांदी संमेलनांच्या खर्चाला कात्री; भव्यतेपेक्षा साहित्यिक आशय, दर्जेदार परिसंवाद आणि वैचारिक मंथनाला प्राधान्य
Marathi Sahitya Sammelan
Marathi Sahitya SammelanPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी आयोजित करण्यात येत असलेल्या नांदी संमेलनांच्या खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. संमेलनांच्या आयोजनात भव्यता आणि अनावश्यक खर्चापेक्षा साधेपणाने, साहित्यिक आशय, दर्जेदार परिसंवाद आणि वैचारिक मंथनाला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून आयोजक संस्थांना देण्यात आल्या आहेत.

Marathi Sahitya Sammelan
Pune Air Pollution: पुण्यात ४१८ कोटींचा निधी खर्चूनही वायुप्रदूषण कायम

भोजनावरील खर्च टाळावा, मोठे मांडव उभारण्याऐवजी सभागृहात कार्यक्रम घ्यावेत, एक दिवसाऐवजी अर्धा दिवस संमेलन आयोजित करावेत, संमेलनातील कार्यक्रमांसाठी दूरवरच्या पाहुण्यांना शक्यतो निमंत्रित न करता स्थानिक आणि पंचक्रोशीतील साहित्यिकांना आणि कलाकारांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्याचे मसापचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Marathi Sahitya Sammelan
Khadakwasla Water Cut: खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी आवर्तनावर पाणीकपातीचे सावट; ४५ दिवसांआधीच पाणी बंद होण्याची शक्यता

शंभरावे साहित्य संमेलन हे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पुण्यात होणार आहे. साहित्य संमेलनापूर्वी विविध विषयांवर ९९ नांदी साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचा, नांदी संमेलनांचा खर्च आणि स्वरूपाविषयी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदी संमेलनांचे आयोजन साधेपणाने केले जात असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. नांदी संमेलनानिमित्त नाष्टा आणि भोजनावर होणारा अतिरिक्त खर्च टाळण्याच्या सूचना देतानाच या बाबींवर अधिकचा खर्च झाल्यास तो खर्च महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दिला जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Marathi Sahitya Sammelan
Maharashtra School Admission Age Limit: शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे अनिवार्य

सोमण म्हणाले की, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन आयोजकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. शक्यतो अर्धा दिवस संमेलन आयोजित करावेत, अनुदानाचा वापर काटकसरीने करावा, मोठ्या नाट्य किंवा गायन कार्यक्रमांऐवजी अभिवाचनासारखे मोजके कार्यक्रम ठेवून साहित्यकेंद्री स्वरूप जपावे, प्रवास आणि आयोजनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नांदी संमेलनांसाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असून, त्यापैकी दोन कोटी रुपये महाराष्ट्र साहित्य परिषदेला प्राप्त झाले आहेत. मंजूर रकमेपैकी ७५ टक्के अनुदान संबंधित नांदी संमेलनाच्या आयोजक संस्थेला दिले जात आहे. संमेलनानंतर आठ दिवसांत खर्चाची बिले आणि सनदी लेखापालांचे विनियोग प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. चहापानाची बिले स्वीकारली जाणार असून, जेवणाची बिले स्वीकारली जाणार नाहीत. अतिरिक्त खर्च अनुदानातून दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साहित्यकेंद्री कार्यक्रमांवर भर

नांदी संमेलनांमधून साहित्याचा प्रसार आणि वाचनसंस्कृतीला चालना देणे अपेक्षित आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता खर्चावर नियंत्रण ठेवून साहित्यकेंद्री कार्यक्रम आयोजित करण्याची भूमिका घेण्यात आली आहे, या संमेलनांतील अध्यक्षीय भाषणांचे संकलन करून त्यांचा दस्तऐवज तयार करण्यात येणार असल्याचेही सोमण यांनी नमूद केले.

साहित्य संमेलन साधेपणाने: योगेश सोमण

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शंभराव्या साहित्य संमेलनाचे महत्त्व जपताना बाह्य भव्यता आणि अनावश्यक खर्चापेक्षा साधेपणाने, साहित्यिक दर्जाशी तडजोड न करता संमेलनाचे आयोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याची भूमिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी स्पष्ट केली.

संमेलनात आशयसमृद्ध कार्यक्रम, दर्जेदार परिसंवाद आणि वैचारिक मंथनाला प्राधान्य दिले जाईल. संमेलनाचे महत्त्व केवळ आयोजनाच्या भव्यतेत नसून, व्यासपीठा वरून मांडले जाणारे विचार आणि साहित्यिक चर्चांच्या गुणवत्तेत आहे. त्यामुळे आयोजन साधेपणाने करून साहित्यप्रेमींना दर्जेदार कार्यक्रमांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय साहित्य महामंडळाचा महाकोश निधी वाढवण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news