

पुणे: मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पुढील आठवड्यापासून ‘स्किल मिक्स’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालये, ग््राामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये वेळेवर वैद्यकीय व शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपक्रमाचा लाभ केवळ मातामृत्यू व बाल आरोग्यापुरता मर्यादित न राहता इतर आजारांसाठी शस्त्रक्रिया व विशेष वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांनाही होणार आहे. पुणे विभागातील प्रथम संदर्भ केंद्रे आणि सार्वजनिक रुग्णालयांमधील सुविधांची तफावत याचा अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ग््राामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया तसेच लहान-मोठ्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यरत एफआरयू सुरू झाल्यास मातृ व बाल मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आकडे काय सांगतात?
2024-25 या कालावधीत महाराष्ट्रात 1,168 मातामृत्यू आणि 0-5 वयोगटातील 13,728 बाल मृत्यू नोंदवले गेले. एफआरयू आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास सर्वसमावेशक आपत्कालीन प्रसूती व नवजात शिशु सेवा तसेच इतर विशेष आपत्कालीन उपचार दिले जातात. प्रत्येक एफआरयूमध्ये किमान चार तज्ज्ञ डॉक्टर-शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ-तसेच प्रशिक्षित परिचारिका व भूलतज्ज्ञ असणे आवश्यक असते.
या कार्यक्रमांतर्गत, तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरजेनुसार नियुक्ती केली जाणार आहे. पुणे विभागात एकूण 67 ग््राामीण व उपजिल्हा रुग्णालये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून अनेक रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांसाठी पाठवले जाते. नव्या प्रणालीमुळे अशा रुग्णांना त्यांच्या जवळच्या ग््राामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयातच विशेष उपचार मिळणार आहेत.