

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा अपप्रचार, खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्टवर पुणे पोलिस विशेष वॉच ठेवणार आहेत. मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.
गेल्या काही वर्षांत निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला असून, त्याच माध्यमातून खोटी माहिती पसरविणे, व्यक्तीविशेष किंवा संस्थांविरोधात अपप्रचार करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणे, असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा आक्षेपार्ह पोस्ट, वक्तव्ये आणि अफवांवर सोशल मीडिया मॉनिटर सेलच्या माध्यमातून कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
बैठकीत निवडणूक काळात नाकाबंदी, संशयितांवर लक्ष, जेलमधून सुटणाऱ्या गुन्हेगारांची दैनंदिन माहिती तपासणे तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक कारवाया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवैध धंदे, बेकायदा व्यवहार आणि सामाजिक शांततेला बाधा पोहचविणाऱ्या गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. कर्तव्याबाहेरील गैरवर्तन किंवा उपद्व्याप करणाऱ्यांवर कारवाई अटळ राहील, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, ३१ डिसेंबर आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवरही बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मद्य विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या एकदिवसीय परवान्यांचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येणार असून, 'ड्रंक अँड ड्राइव्ह'विरोधात विशेष मोहिमा राबवून दारूबंदीशी संबंधित गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
तसेच वैद्यकीय आस्थापनांमध्ये तोडफोड किंवा डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रकार सहन केले जाणार नसून, अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.