

पुणे : शहरातील विविध भागात नागरिकांकडून प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईलचा पुणे गुन्हे शाखेच्या युनीट दोनने शोध घेत महिनाभरात ३ लाख २१ हजारांचे २१ मोबाईल जप्त करून नागरिकांना परत मिळवून दिले.
मोबाईल फोन हरवलेल्यासह चोरीच्या अनेक तक्रारी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास करण्यात येत होता. युनिट दोनचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे पेट्रोलिंगदरम्यान डिसेबर २०२५ मध्ये हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत होते.
त्यावेळी पोलिस अंमलदार सद्दाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषण केले. युनिट दोनच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांतर्गत गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेतला. ठिकठिकाणांहून शोध घेत वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल २१ मोबाईल फोन ताब्यात घेतले. मिळून आलेल्या मोबाईल फोनसंदर्भात संबंधितांना संपर्क करून त्यांना मोबाईल परत देण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, सद्दाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संजय जाधव, शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय कुमार पवार, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात यांच्या पथकाने केली.