

पुणे: वाचनाची चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ’शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख 35 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तकवाचन करून छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली. सकाळी 11 ते दुपारी 12 या तासाभरात 70 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पुस्तकवाचन करून आपले छायाचित्र वेबसाइटवर अपलोड केल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने पुणे पुस्तक महोत्सव 2025 येत्या 13 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. या पार्श्वभूमीवर ’शांतता... पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मेट्रो, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वाचनालय ग््रांथालय, मदरसे, बसथांबे, पुणे महानगरपालिकेची कार्यालये, जिल्हा प्रशासनाची कार्यालये, सरकारी आणि खासगी आस्थापने, रिक्षाथांबे, आयटी कंपन्या, उद्योग, सामाजिक संस्था, संघटनांची कार्यालये अशा सर्वच ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे आवडीची पुस्तके वाचत होते. या वाचन उत्सवात 17 ते 22 वयोगटांतील युवकांची संख्या सर्वाधिक होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले.
या उपक्रमात सकाळी 11 ते 12 या वेळेत 70 हजार 238 हजार नागरिकांनी लिंकवर आपले छायाचित्र अपलोड केले. त्यामध्ये 36 हजार 523 महिला असून, पुरुषांची संख्या 33 हजार 715 आहे. आता सर्वांनी अपलोड केलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून ’शांतता... पुणेकर वाचत आहेत’ हे वाक्य तयार करून त्याची ’गिनीज बुक ऑफ रेकॉड्र्स’मध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात येणार आहे.
या विश्वविक्रमासाठी कोहिनूर ग््रुापचे कृष्णकुमार गोयल यांचे पाठबळ लाभले असून, त्यांच्याकडून आवश्यक ती मदत करण्यात येत आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाची वैशिष्ट्ये
एकूण फोटो (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) : 1, 35,238
महिला सहभाग : 52% (70, 323)
पुरुष सहभाग : 48% (64,915)
सर्वाधिक सक्रिय वयोगट : 17 ते 22 वर्षे
सर्वाधिक लोकप्रिय साहित्यप्रकार : इतिहास, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य
सर्वाधिक वाचली गेलेली पुस्तके : छत्रपती शिवाजी महाराज (चरित्र), श्यामची आई, रिच डॅड पुअर डॅड, द अल्केमिस्ट, ॲटॉमिक हॅबिट्स, थिंक अँड ग््राो रिच, विंग्स ऑफ फायर, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड, स्टीव्ह जॉब्स
वाचन ही केवळ वैयक्तिक सवय नसून, समाजाला वैचारिक दिशा देणारी शक्ती आहे. ’शांतता... पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात हजारो नागरिकांनी पुस्तक हातात घेऊन दिलेल्या सहभागाने वाचनसंस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रत्येक वाचकाचा एक फोटो म्हणजे फक्त एक नोंद नाही, तर ज्ञान, प्रबोधन आणि विचारमूल्ये जपणाऱ्या समाजाची नांदी आहे. पुणे पुस्तक महोत्सवाद्वारे आम्ही तरुणाईत गंभीर, सशक्त आणि वैचारिक बदल घडविण्याचे स्वप्न पाहतो आणि आजच्या प्रतिसादाने ते स्वप्न अधिक दृढ झाले आहे.
राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव