

पुणे: मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत तसेच पाणी पुरवठ्याच्या नियमांचे पालन न केल्याने महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने महानगरपालिकेला पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. 2018 पासून महापालिकेच्या अपील प्रकरणात प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेले आदेश, सूचना आणि सुनावणीतील निर्देशांचे पालन सातत्याने न झाल्याचा उल्लेख देखील बाजवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये करण्यात आला आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर 2017 मध्ये पुणे शहराला वार्षिक 8.19 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीवापर मंजूर केला होता. म्हणजेच 635 दशलक्ष लिटर (एमएलडी) दररोज पाणी वापरता येईल. त्यानंतर खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत वार्षिक 11.50 टीएमसी (दररोज 892 एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, सध्या महानगरपालिका 1350 एमएलडी पाणी उचलत आहे.
महानगरपालिकेने अद्यापही जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. खडकवासला धरणातून पाणी घेण्याची यंत्रणा महानगरपालिकेची आहे. ती त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन करून पाणी घेण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. महानगरपालिका वापरत असलेल्या जास्तीच्या पाण्यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणी कमी पडते.
पाणीपुरवठा लोकसंख्या निकषांनुसार करणे, वॉटर बजेट सादर करणे, प्रतिज्ञापत्रे देणे तसेच 2018 ते 2025 या कालावधीत प्राधिकरणाच्या अनेक सुनावण्या, आदेश आणि बैठकींच्या निर्णयांचे पालन करण्यात महापालिकेकडून झालेल्या त्रुटींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण अधिनियम,2005 च्या कलम 26 अन्वये कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची गरज निर्माण झाल्याचे प्राधिकरणाने बजावलेल्या नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राधिकरणाचे सचिव मल्लिकार्जुन धराने यांनी जारी केलेल्या या नोटिशीत महापालीकेला मागील सर्व आदेश आणि निर्देशांचे पालन कधी, कसे आणि किती प्रमाणात झाले याचे सविस्तर स्पष्टीकरण देणारे व्यापक प्रतिज्ञापत्र एका महिन्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास दंडात्मक कारवाईची करण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे.
शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 2011 च्या लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. मात्र, पुण्याची लोकसंख्या ही जास्त आहे. त्यामुळे 21 टीएमसीची मागणी केली आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात चांगल्या पाइपलाइन टाकणे, मीटर बसवणे यासारख्या उपाययोजना सुरू आहेत. मात्र, पुण्याची हद्द वाढली असल्याने पाण्याची मागणी देखील वाढत आहे. प्राधिकरणाच्या नोटिशीचा अभ्यास करून त्याला उत्तर देण्यात येईल.
नंदकुमार जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग महापालिका