

पुणे: पादचाऱ्यांना अडथळामुक्त आणि सुरक्षित चालण्याचे स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने पुणे महापालिकेने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेला पादचारी दिन उपक्रमाचा यंदा पालिकेला विसर पडला आहे. दरवर्षी 11 डिसेंबरला महापालिका पादचारी दिन साजरा करत असते. लक्ष्मी रस्ता पूर्णपणे वाहनमुक्त करून विविध उपक्रमांचे आयोजन हे या दिवसाचे मुख्य आकर्षण असते. मात्र, या वर्षी महापालिकेकडून कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमात गेल्या चार वर्षांत 11 डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले गेले. उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनमुक्त ठेवला जात असे. वॉकिंग प्लाझा, संवादात्मक उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा.
या उपक्रमातून देशातील पादचारी दिन साजरा करणारी पहिली महापालिका म्हणून पुण्याने विशेष ओळख निर्माण केली. मात्र, यावर्षी गुरुवार, 11 डिसेंबर रोजी हा उपक्रम साजरा करण्याची कोणतीही तयारी महापालिकेने केलेली नाही. यामुळे लक्ष्मी रस्ता यंदा नेहमीप्रमाणे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.
महापालिकेच्या या उदासीन भूमिकेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पादचारी मार्गांची सुधारणा, वाहनांमुळे होणारी कोंडी व प्रदूषण कमी करणे, झेबा क्रॉसिंग, सिग्नल सुधारणा आणि पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उपक्रम सुरू केला होता. मग हे प्रश्न पूर्णपणे सुटले का? यंदा हा उपक्रम का साजरा करण्यात आला नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
याबाबत स्पष्टीकरण देताना महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, “पादचारी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील विविध भागांतील पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक उपक्रमांचे नियोजन केले जात आहे.”