

चाकण: चाकण नगरपरिषदेद्वारे बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1996 चे तरतुदीनुसार चाकण शहरातील विविध अनाधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या मंडळींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
परंतु, तरीही काही अनधिकृत अभिन्यासधारकांना या नोटिसचे पालन न केल्याने संबंधित प्लॉटिंग सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पालिकेने प्लॉटिंगकडे जाण्यासाठी केलेले सिमेंटचे रस्ते उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.
चाकण पालिकेकडून ही कारवाई पुढील काही दिवस सुरूच राहणार असून, शहरातील इतरही अनधिकृत प्लॉटिंगवर देखील कारवाई होणार आहे. यापुढेही अशी कारवाई होणार असून, पुन्हा कोणीही असा अनधिकृत विकास करू नये.
केवळ नगरपरिषदेमार्फत मंजूर भूखंड (प्लॉटस)चीच खरेदी करावी, जेणेकरून अशा अनाधिकृत विकासास प्रतिबंध करणे प्रशासनास शक्य होईल, असे जाहीर आवाहन चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे.
या कारवाईत नगरपरिषदेचे बांधकाम विभाग, नगररचना विभाग, स्वच्छता विभाग, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा व इतर विभागातील जवळपास 6 अधिकारी, 30 कर्मचारी, 5 पोलिस कर्मचारी व अधिकारी, 4 जेसीबी, 2 व्हिडीओग््रााफर, 1 अग्निशमन बंब, 1 अग्निशमन दुचाकी, 6 अग्निशमन कर्मचारी, 1 ट्रेलर आदी यंत्रणा उपस्थित होती. यामुळे बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले आहे.