

उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड-पुणे मार्गावरील प्रवासी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत. सततच्या तक्रारींनंतरही रेल्वे प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने प्रवासी वैतागले असून कधीही उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मार्गावर चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून आरपीएफ (RPF) आणि रेल्वे पोलिसांना चोर पकडण्यात अपयश येत असल्याने प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे.
तिसऱ्या कुरकुंभ मोरी गळतीमुळे असुरक्षित
सन 2014 मध्ये सुरू झालेले तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे काम जवळपास सात वर्षांनंतर सन 2021 मध्ये पूर्ण झाले. उद्देश असा की जुन्या दोन मोऱ्यांमधील सततचे ड्रेनेज पाणी आणि नागरिकांची हालअपेष्टा कमी करणे. परंतु नवीन मोरीदेखील गळतीने त्रस्त आहे. रेल्वे प्रशासनाने ही मोरी उद्घाटनाशिवायच सुरू करून स्वतःच्या निकृष्ट कामाला झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. श्रेयासाठी पोस्टरबाजी करणारे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अचानक मौनात गेले आहेत.
रेल्वे हद्दीतील सर्व कामे दर्जाहीन; अधिकारी मौन का?
दौंड रेल्वे परिसरातील रस्ते, सुविधांचे बांधकाम आणि सुधारणा कामे अतिशय निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही रस्ते तर वर्षभरातच पुन्हा खोदकाम झाल्यासारखे झाले आहेत. ठेकेदार पैशाच्या जोरावर सर्व काही मनमानीपणे करतो आणि अधिकारी डोळेझाक करतात, असा लोकांचा आरोप आहे.
कॉर्ड लाईन्स परिसर प्रवाशांसाठी जीवघेणा
कॉर्ड लाईन्स परिसरात रात्री कोणतीही वाहतूक सुविधा नसल्याने प्रवाशांना 250 ते 300 रुपये रिक्षा भाडे मोजावे लागते. परवडत नसल्यामुळे अनेक कुटुंबे तीन किलोमीटर अंतर अंधारात पायी चालत जातात. या रस्त्यावर लुटमार आणि मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीदेखील रेल्वे प्रशासनाने मूलभूत सुरक्षाव्यवस्था पुरविलेली नाही.
नवीन बीजवरील चढ-उतार अत्यंत कष्टदायक
दौंड स्टेशनवरील नव्याने बांधलेल्या उंच पुलामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना प्रचंड त्रास होत आहे. येथे स्लोप, लिफ्ट किंवा एस्केलेटर बसविण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे.
प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
तिसऱ्या कुरकुंभ मोरीतील गळती तातडीने दुरुस्त करावी.
दौंड-पुणे मार्गावर चोरी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवावी.
कॉर्ड लाईन्स परिसरात रात्री वाहतुकीची व्यवस्था करावी.
ठेकेदारांच्या सर्व कामांची गुणवत्ता तपासून जबाबदारांवर कारवाई.
स्टेशनवर लिफ्ट/एस्केलेटरसारख्या सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात.