दौंडच्या शिवभक्तांची पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती

दौंडच्या शिवभक्तांची पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती

नानगाव(पुणे) : पावसाच्या सरी, गार वारा, जंगल, चिखल, दगड, ओढ्यांच्या व चढ-उताराच्या वाटा पायाखाली तुडवत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत दौंड तालुक्यातील पारगाव सा. मा. व खोपोडी येथील 14 शिवभक्तांनी पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गाने पदभ्रमंती केली. जवळपास 40 किलोमीटर अंतर पायी पार करीत त्या ऐतिहासिक मार्गाचा अनुभव घेत पावनखिंड संग्राम आणि तेजस्वी शिवचरित्रातील रोमांचकारी पर्वाचा अनुभव घेतला.

दै. 'पुढारी'चे नानगाव येथील वार्ताहर राजेंद्र खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विकास ताकवले, पांडुरंग ताकवणे, केशव ताकवणे, ओंकार ताकवणे, शुमभ ताकवले, समीर भोगावडे, दीपक शितोळे, शेखर भोसले, अमोल पवार, निखिल लगड, हरिश्चंद्र जगताप, ओंकार पवार, विजय धुमाळ यांनी सहभाग घेतला होता.

पदभ्रमंतीची सुरुवात पन्हाळगड पाहून येथील भग्नावस्थेत असलेल्या राजदिंडी दरवाजातून झाली. स्वराज्याचे प्राण जपणारा हा दरवाजा तेजस्वी इतिहासाची साक्ष देत भग्नावस्थेत आजही आपल्याला स्फूर्ती देत उभा आहे. एका बाजूला दौलती बुरूज, तर एका बाजूला पन्हाळगडाची बुलंद तटबंदी आहे. याच दरवाजातून थेट पन्हाळगडाच्या बाहेर घनदाट जंगलात सह्याद्रीच्या कुशीत उतरता येते. जंगलातून उतरत्या वाटेने खाली आल्यावर एक पक्का रस्ता सुरू होतो. याच रस्त्याने झाडीझुडपातून चढाच्या वाटेने आपण म्हाळुंगे गावात पोहचतो, तर पुढे काही अंतर चालत गेल्यास मोठे व विस्तीर्ण मसई पठार सुरू होते.

हे पठार मोठे असून, यावर मसई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात परिसरातील भक्तगण दर्शनासाठी येत असतात. बराचवेळ चालून खाली आल्यावर आपण कुंभारवाडीत पोहचतो. पुढे खोतवाडी, मंडलाईवाडी, धनगरवाडा, करपेवाडी, आंबेवाडी, केळेवाडी, रिंगेवाडी, पाटेवाडी, म्हाळसावडे, मान-धनगरवाडा, पांढरेपाणी, मालाईवाडा व त्यानंतर आपण पावनखिंडीत पोहचतो. या संपूर्ण प्रवासात भातशेती, जंगल, ओढे, वाड्यांचा समूह, चढ-उतारांच्या चिखलातील वाटा, मोठमोठे ओढे पायाखाली तुडवत आपण पावनखिंड येथे पोहचतो. या ऐतिहासिक मार्गावर भगवा ध्वज असलेल्या दगडी खुणा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा मार्गाने पदभ्रमंती करताना सोपे जाते. मात्र, पावसाळ्यात काही ठिकाणी आपल्या अनुभवाचादेखील कस लागतो.

पावनखिंड येथे सुरुवातीला एक नव्याने बांधलेला बुरूज नजरेस पडतो. याच बुरुजाच्या पाठीमागून आपण पावनखिंडीत उतरतो. या ठिकाणी खिंडीत उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी लावण्यात आली आहे. याच शिडीच्या साहाय्याने आपण ऐतिहासिक पावनखिंडीत उतरतो. पन्हाळगड ते पावनखिंड हा पायी प्रवास आणि पावनखिंड परिसर पाहताना आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तो पावनखिंंडीतील घडलेला इतिहास. स्वराज्य आणि आपला राजा सुखरूप राहिला पाहिजे यासाठी जीवाची पर्वा न करता लढणार्‍या स्वामिनिष्ठ मावळ्यांना मानाचा मुजरा करत येथेच पदभ्रमंतीची सांगता होते.

राजदिंडी दरवाजाचे महत्त्व

राजदिंडी दरवाजातून शिवरायांबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, हैबतराव, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंह जाधव यांच्यासह स्वामिनिष्ठ 600 मावळे रात्रीच्या वेळी भर पावसात विशाळगडाकडे निघाले होते. याच वेळी आणखी एक पालखी निघाली ती होती शिवा काशिद यांची. याच दरवाजातून पायी पदभ्रमंतीला सुरुवात होते.

पावनखिंडीतील रणसंग्राम हा स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा इतिहास अनुभवायचा असेल, तर नक्कीच सर्वांनी एकदातरी पावसाळ्यात पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती करावी.

– विकास ताकवले, शिवभक्त

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news