जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जुन्नर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरालगतच्या कुंभार तलाव, ग्रामीण रुग्णालय परिसर तसेच बारव या नागरी वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला आहे. बारव येथे गुरुवारी (दि. 3) मध्यरात्री बिबट्याने एका घोड्यावर हल्ला करीत त्याला ठार केले. जवळच असलेल्या मेंढपाळ तांड्यातील एका मेंढीवर हल्ला करून ठार केले. एका रात्रीत घडलेल्या या दोन घटनांमुळे बारवमधील नागरिकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे.

जुन्नर-नारायणगाव रस्त्यालगत असलेल्या ग्रामीण रुग्णालय, कुंभार तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असून, रात्रीच्या वेळी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. ग्रामीण रुग्णालय तेथील अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने, नगरपरिषद कर्मचारी वसाहत या ठिकाणी असून, या रस्त्यालगत अनेक लहान-मोठी दुकाने, घरे, निवासी इमारती असल्याने बिबट्याच्या वावरामुळे या भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

शहरालगत बारव गाव नव्याने विकसित झालेले असून, या भागात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. येथे राहत असलेले अयान नूला सय्यद यांचा पाळीव सुमारे पाच वर्षांचा घोडा शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. याच परिसरात मुक्कामी असलेल्या मेंढपाळाच्या तांड्यावर बिबट्याने हल्ला करीत एका मेंढीला ठार केले. एकाच रात्रीत घडलेल्या या दोन घटनांमुळे बारव परिसरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जुन्नर वन विभागाचे वनपाल नितीन विधाटे, स्वरूप रेंगडे, संतोष भालेकर यांनी बारव येथे घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. वन विभागाच्या वतीने कुंभार तलाव परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून, बारव येथेही लावण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या परिसरातील नागरिकांनी दिवसा तसेच रात्री सतर्क राहण्याबाबतच्या सूचना वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news